टीम इंडियाचा पहिला पराभव
By Admin | Updated: July 23, 2015 00:48 IST2015-07-23T00:48:50+5:302015-07-23T00:48:50+5:30
जर्मनी आणि न्यूझीलंडविरुद्ध आपले सुरुवातीचे साखळीतील सामने जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला येथे वाल्वो इंटरनॅशनल अंडर २१ पुरुष हॉकी

टीम इंडियाचा पहिला पराभव
ब्रेदा : जर्मनी आणि न्यूझीलंडविरुद्ध आपले सुरुवातीचे साखळीतील सामने जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला येथे वाल्वो इंटरनॅशनल अंडर २१ पुरुष हॉकी स्पर्धेत बेल्जियमकडून १-३ असा पराभव पत्करावा लागला.
तिसऱ्या साखळी सामन्यात भारतीय संघ आधीच्या सामन्यातील शानदार कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही; परंतु उत्तरार्धात दोन्ही संघांनी एकमेकांना गोल करण्यापासून रोखले. त्यामुळे पूर्वार्धात दोन्ही संघांना गोलचे खाते उघडता आले नाही. तथापि, उत्तरार्धात बेल्जियमने दोन गोल करून भारतीय संघाला दबावात आणले. भारताकडून एकमेव गोल हरमनप्रीतसिंहने केला.
भारत आणि बेल्जियमच्या संघांनी पूर्वार्धात खूप आक्रमक कामगिरी केली आणि चेंडूवर नियंत्रण ठेवले. भारताने प्रतिस्पर्धी संघाच्या मिडफिल्डला खूप गुंतवून ठेवले. भारताने चांगली कामगिरी करताना अनेक पेनल्टी कॉर्नर मिळवले; परंतु बेल्जियमच्या भक्कम बचावाला ते भेदू शकले नाहीत. बेल्जियमनेदेखील भारताला लगेच प्रत्युत्तर दिले. पूर्वार्धात बेल्जियमने पेनल्टी कॉर्नर मिळवला; परंतु भारतीय गोलरक्षक सूरज कारकेरा याने सफाईने बचाव केला आणि पूर्वार्ध ०-० यावर समाप्त झाला. उत्तरार्धात दोन्ही ज्युनियर संघांनी पुन्हा आक्रमण केले आणि गोल करण्यासाठी हल्ल्याची धार आणखी वाढवली.
बेल्जियमने उत्तरार्धाच्या काही मिनिटांतच पेनल्टी कॉर्नर मिळवला; परंतु सूरजने पुन्हा त्याचा बचाव करताना त्यांना गोल करण्यापासून रोखले. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला टॉम डेगरुटने जबरदस्त गोल करताना बेल्जियमला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताने एकापाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले आणि ड्रॅग फ्लिकर हरमनप्रीतसिंहने ४८ व्या मिनिटाला दुसऱ्या संधीच्या वेळी गोल करीत भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर सातच मिनिटांनी बेल्जियमने प्रत्युत्तरात जोरदार हल्ला केला आणि ५५ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला.
त्यावर टँगाए जिमरने गोल करीत बेल्जियमला २-१ अशी पुन्हा आघाडी मिळवून दिली. जेव्हियर डेरयुटेरेने बेल्जियमचा तिसरा गोल करताना आघाडी दुप्पट करताना त्यांची स्थिती ३-१ अशी केली. भारताने अखेरच्या क्षणी दोन गोल खाल्ल्यानंतर काही संघर्ष केला आणि अखेरच्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नर मिळवला; परंतु टीम इंडिया त्याचे रूपांतर गोलमध्ये करू शकली नाही. भारताची पुढील लढत यजमान हॉलंडविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)