टीम इंडियाचा ‘दणादण’ सराव
By Admin | Updated: December 5, 2014 23:56 IST2014-12-05T23:56:47+5:302014-12-05T23:56:47+5:30
कसोटी मालिकेआधी टीम इंडियाने आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध फलंदाजी- गोलंदाजीचा दणादण सराव केला. दोन दिवसांचा हा सामना अनिर्णीत राहिला, पण वर्चस्व मात्र भारतीय खेळाडूंचेच होते.

टीम इंडियाचा ‘दणादण’ सराव
अॅडिलेड : कसोटी मालिकेआधी टीम इंडियाने आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध फलंदाजी- गोलंदाजीचा दणादण सराव केला. दोन दिवसांचा हा सामना अनिर्णीत राहिला, पण वर्चस्व मात्र भारतीय खेळाडूंचेच होते.
भारताने ९० षटकांत ३७५ धावा ठोकून ९ डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटीसाठी सज्ज असल्याची चुणूक दाखविली. फलंदाजांच्या यशानंतर गोलंदाजही सव्वाशेर ठरले. भारतीय गोलंदाजांनी सामना संपेपर्यंत सीए एकादशचे ८३ धावांत पाच फलंदाज तंबूत पाठविले होते. भारताने सकाळी २ बाद ९९ वरून खेळ सुरू केला. विराट कोहली (६६) आणि मुरली विजय (६०) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १२३ धावा खेचल्या. या दोघांना क्रमश: शून्य आणि पाच धावांवर जीवदान लाभले होते. अर्धशतकी खेळीनंतर दोघेही निवृत्त झाले. त्यांची जागा घेणारे रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी फिरकी तसेच वेगवान मारा सहजपणे खेळून काढला. या दोघांनी पाचव्या गड्यासाठी १०३ धावा ठोकल्या. रहाणे ५६ धावा काढून निवृत्त झाला. रोहित मात्र अर्धशतकापासून वंचित राहिला. तो चुकीने धावबाद झाला. त्याने ४८ धावा केल्या. रैना (२०) हा खेळताना अडखळत होता. रिद्धिमान साहाने ५१ धावांचे योगदान दिले. ९० व्या षटकांत तो बाद झाला. सीएकडून ज्योश लालोर याने १७ षटकांत ५९ धावा देत चार गडी बाद केले.
यानंतर भारताने उर्वरित २४ षटकांत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यातील २१ षटके गोलंदाजी केल्यानंतर फुटबॉलचा सराव केला. उमेश यादवने ३० धावांत एक, वरुण अॅरोनने २८ धावांत एक, तर ईशांत शर्मा याने पाच षटकांत आठ धावा मोजून दोन गडी बाद केले. कर्ण शर्माला एक गडी बाद करण्यात यश आले. (वृत्तसंस्था)