टीम इंडियाला जखमांनी ग्रासले : वेंगसरकर
By Admin | Updated: February 7, 2015 01:38 IST2015-02-07T01:38:17+5:302015-02-07T01:38:17+5:30
जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.

टीम इंडियाला जखमांनी ग्रासले : वेंगसरकर
मुंबई : टीम इंडियाने विश्वचषकासाठी संघ निवडताना अनेक जखमी खेळाडूंना स्थान दिले. यामुळे जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला फटका बसू शकतो, अशी भीती माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी व्यक्त केली आहे.
विशेष मुलाखतीत वेंगसरकर म्हणाले,‘‘खेळाडू फिट होतील या आशेपोटी संघात जखमी खेळाडूंचा भरणा करणे अंगलट येऊ शकते.’’ गेल्या विश्वचषकात ‘मॅन आॅफ द टुर्नामेंट’ बनलेला युवराजसिंग आणि फॉर्ममध्ये असलेला सलामीचा फलंदाज मुरलीविजय याला
बाहेर ठेवण्याचा निर्णय ‘आश्चर्यकारक’ असल्याचे वेंगसरकरचे मत आहे. पाकविरुद्ध भारताला पहिलाच सामना खेळायचा आहे. वेंगसरकर यांच्या मते हा सामना भारताला संधीसारखा असेल. यात विजय मिळवून संघाचे मनोबल उंचावू शकतो, असे ते म्हणाले.
या मुलाखतीचे मुख्य अंश असे...
प्रश्न : आॅस्ट्रेलियातील दारुण पराभवाचा परिणाम विश्वचषकात होईल?
वेंगसरकर : असे व्हायला नको. विश्वचषक वेगळ्या पद्धतीची स्पर्धा आहे. भारताविरुद्ध पाकचे रेकॉर्ड शून्य आहे, शिवाय त्यांचा संघ दुबळा आहे. संघाचे संयोजन फिट असेल तर पाकला नमवून विजयी वाटचाल करू शकतो.
प्रश्न : काही जखमी खेळाडूंचा भरणा असल्याने संघाच्या संयोजनावर समाधानी आहात का?
वेंगसरकर : संघाकडे पर्याय नसल्याने जखमी खेळाडूंना ठेवावे लागत आहे. खेळाडू फिट होतील या आशेवर राहू नका. त्यापेक्षा यशासाठी उत्साही असलेल्या नव्या दमाच्या खेळाडूंना स्थान द्यावे. ईशांत फिट नसेल तर धवल कुलकर्णीला संधी द्या.
प्रश्न : युवराजसिंगला अंतिम एकादशमध्ये स्थान मिळायला हवे होते?
वेंगसरकर : युवराजला संधी नाकारणे आश्चर्यचकित करणारे आहे. स्थानिक सामन्यात शानदार खेळत असून, ‘मॅचविनर’ आहे. गोलंदाजी व क्षेत्ररक्षणातही कामात येतो. याशिवाय मुरली विजयला स्थान नाकारणे अधिक निराशाजनक आहे.
प्रश्न : आॅस्ट्रेलियात गोलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. गडी बाद करणारे आणि धावा रोखणारे गोलंदाज नाहीत, यावर काय मत आहे?
वेंगसरकर : आमच्याकडे दुर्दैवाने असे गोलंदाज नाहीत. गेल्या काही वर्षांत आम्ही दूरदृष्टी दाखविलेली नाही. खेळाच्या सर्व प्रकारात त्याच त्या गोलंदाजांच्या सेवा घेऊन त्यांचा फॉर्म खराब केला. आता महत्त्वाच्या स्पर्धेत हे गोलंदाज फिटनेस आणि फॉर्मशी झुंज देत आहेत.
प्रश्न : भारताशिवाय विश्वचषकाचे प्रबळ दावेदार कोण?
वेंगसरकर : आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांना भक्कम संधी असेल.
(वृत्तसंस्था)