टीम इंडिया मुसंडी मारणार?

By Admin | Updated: March 3, 2017 00:11 IST2017-03-03T00:11:43+5:302017-03-03T00:11:43+5:30

भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना ३३३ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला.

Team India to scramble? | टीम इंडिया मुसंडी मारणार?

टीम इंडिया मुसंडी मारणार?


नवी दिल्ली : भारताने आॅस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतील पहिला सामना ३३३ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. आता मालिकेत मुसंडी मारण्याचे अवघड आव्हान आहे. १९३२पासून कसोटी क्रिकेट खेळत असलेला भारतीय संघ पहिला सामना गमावल्यानंतर केवळ तीनदा मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला, हा इतिहास आहे.
पुण्यातील फिरकीला पूरक असलेल्या खेळपट्टीवर फलंदाजांनी नांगी टाकताच विराटचा संघ धराशायी झाला. उर्वरित ३ सामने जिंकून मालिका-विजय कसा मिळवायचा, याचे उत्तर संघ व्यवस्थापनाला शोधायचे आहे.
पुण्यातील पराभवानंतर कोहलीने लंकेविरुद्ध केलेल्या कामगिरीचे उदाहरण देत ‘आम्हाला केवळ अशा कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल,’ यावर भर दिला होता.
दुसरीकडे, आॅस्ट्रेलियाने २००५च्या अ‍ॅशेस मालिकेत पहिला सामना जिंकल्यानंतरही मालिका गमावली होती. आॅस्ट्रेलियाचा पहिला कसोटी सामना जिंकण्याचा विक्रम २०१ पैकी १०९ असा आहे. ४५ सामने गमावले. दुसऱ्या सामन्यातील त्यांचा विजयाचा विक्रम २०० पैकी ९७ विजय आणि ५२ पराभव, असा आहे.
भारतीय संघाला शनिवारपासून बंगळुरु येथे पुन्हा सामोरे जायचे आहे. हा सामना जिंकून मालिकेत परतण्याचे वेध कोहली अँड कंपनीला असतील. चिन्नास्वामीवर भारताने आतापर्यंत २१ कसोटी सामने खेळले असून ६ जिंकले व ६ गमावले आहेत. ९ सामने अनिर्णीत राहिले. आॅस्ट्रेलियाने या मैदानावर ५ कसोटी सामने खेळले असून त्यांना २ विजय मिळाले.
एका सामन्यात त्यांचा पराभव झाला, तर दोन सामने अनिर्णीत राहिले. मागच्या एका दशकापासून भारत या मैदानावर अपराजित राहिला आहे. यादरम्यान भारतीय संघाने ५ सामने खेळले. त्यांपैकी २ विजय मिळाले, तर ३ सामने अनिर्णीत राहिले आहेत. २०१०मध्ये भारताने याच मैदानावर आॅस्ट्रेलियाला ७ गड्यांनी पराभूत केले होते. (वृत्तसंस्था)
>आकडे काय सांगतात..?
इंग्लंडविरुद्ध १९७२-७३मध्ये, आॅस्ट्रेलियाविरुद्ध २००१मध्ये तसेच श्रीलंकेविरुद्ध २०१५मध्ये पहिला सामना गमावल्यानंतरही भारताने मुसंडी मारून मालिका जिंकली. यांपैकी इंग्लंडविरुद्ध चारपेक्षा अधिक सामने खेळले गेले. अन्य दोन मालिकांमध्ये प्रत्येकी ३ कसोटी सामन्यांचा समावेश होता.
वेस्ट इंडीजविरुद्ध
१९८७-८८ आणि इंग्लंडविरुद्ध २००२मध्ये भारताने ४ सामन्यांच्या मालिका पहिला सामना गमावल्यानंतरही
१-१ अशा बरोबरीत सोडविल्या आहेत.भारतीय संघ पहिला सामना गमावल्यानंतर एकूण ८ वेळा मालिका बरोबरीत सोडविण्यात यशस्वी ठरला. कसोटी मालिकांमध्ये भारताने १४० पैकी ३६ वेळा पहिल्या सामन्यात विजय नोंदविला. ५२ वेळा संघ पराभूत झाला, तर एक सामना टाय झाला. अन्य ४९ सामने अनिर्णीत राहिले. मालिकेतील दुसऱ्या सामन्यातील भारताचा रेकॉर्ड फारच चांगला आहे. १४० पैकी ४२ विजय, ३८ पराभव आणि ६० सामने अनिर्णीत अशी उत्साहवर्धक आकडेवारी पाहायला मिळते. भारताने तिसऱ्या कसोटीच्या रूपात ११८ पैकी ३२ विजय, ३५ पराभव आणि ५१ ड्रॉ, तसेच चौथ्या कसोटीच्या रूपात ५७ पैकी १४ सामने जिंकले व १८ गमावले. अन्य २५ सामने अनिर्णीत राहिले होते.
१९७२-७३मध्ये अजित वाडेकर यांच्या नेतृत्वात दिल्लीत पहिला सामना गमावल्यानंतर कोलकाता येथील पुढील सामन्यात इंग्लंडवर २८ धावांनी विजय नोंदविला. चेन्नईचा तिसरा सामना पुन्हा ४ गड्यांनी विजय नोंदवून कानपूर तसेच मुंबईतील कसोटी सामने अनिर्णीत राखून २-१ ने मालिका जिंकली होती.
२००१मध्ये सौरभ गांगुलीच्या संघाने अशीच कमाल केली. आॅस्ट्रेलियाविरुद्ध मुंबई कसोटी १० गड्यांनी गमावल्यानंतर कोलकाता कसोटीत फॉलोआॅननंतरही लक्ष्मण तसेच भज्जीच्या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर १७१ धावांनी विजय मिळविला. चेन्नईचा पुढील सामना दोन गड्यांनी जिंकून मालिका २-१ अशी खिशात घातली.
>२०१५मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात श्रीलंकेला गाले कसोटी ६३ धावांनी गमावली होती. नंतर कोलंबोत झालेले दोन्ही कसोटी सामने अनुक्रमे २७६ आणि ११७ धावांनी जिंकून मालिका २-१ ने जिंकली.

Web Title: Team India to scramble?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.