टीम इंडियाने केला फिल्डिंगचा सराव
By Admin | Updated: February 26, 2015 00:55 IST2015-02-26T00:55:46+5:302015-02-26T00:55:46+5:30
वर्ल्डकपमध्ये सलग दोन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी बुधवारी सराव सत्रात फिल्डिंग आणि झेल घेण्याचा कसून सराव केला़

टीम इंडियाने केला फिल्डिंगचा सराव
पर्थ : वर्ल्डकपमध्ये सलग दोन विजय मिळविल्यामुळे आत्मविश्वास उंचावलेल्या भारतीय संघातील खेळाडूंनी बुधवारी सराव सत्रात फिल्डिंग आणि झेल घेण्याचा कसून सराव केला़
टीम इंडियातील खेळाडूंनी सराव करताना पहिल्या सत्रात ‘डमी झेल’वर लक्ष्य केंद्रित केले़ झेल घेताना कशा प्रकारे खेळाडूंची रिअॅक्शन
असावी, यासाठी खेळाडूंनी हा सराव केला़ दुसऱ्या सत्रात खेळाडूंनी फिल्डिंगवर विशेष मेहनत घेतली़ यासाठी दोन संघ तयार करण्यात आले होते़
संघाचा सहायक प्रशिक्षक संजय बांगर याने झेल घेण्याचा सराव करण्यासाठी खेळाडूंचे चार गट तयार केले़ खेळाडू बांगरपासून १० मीटर अंतरावर उभा होता़ टेनिसचा चेंडू असल्यामुळे खेळाडूंना झेल टिपण्यासाठी अवघ्या एका सेकंदाचा अवधी असायचा़ या सरावात सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि विराट कोहली यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले़
फिल्डिंग सत्रात प्रत्येकी ८ खेळाडूंचे दोन गट तयार करण्यात आले होते़ प्रत्येक खेळाडूला चेंडू उचलल्यानंतर थेट स्टम्पस्वर
मारणे गरजेचे होते़ टीम इंडियातील खेळाडूंनी या सत्रात चांगलाच
घाम गाठला़ या वेळी सहायक प्रशिक्षक आऱ श्रीधर, व्हिडिओ विश्लेषक संदीप यांनी पंचांची भूमिका निभावली़ (वृत्तसंस्था)