संघात पुनरागमनाचा विश्वास होता
By Admin | Updated: October 21, 2015 01:37 IST2015-10-21T01:37:15+5:302015-10-21T01:37:15+5:30
‘संघातून बाहेर फेकल्यानंतर काही काळ मी क्रिकेटपासून दूर होतो. मित्र व इतर कामांमध्ये गुंतून राहिलो होतो. मात्र, माझ्याकडे अजून वेळ असून, मी स्वत:ला सिद्ध करू शकतो, ही जाणीव

संघात पुनरागमनाचा विश्वास होता
नवी दिल्ली : ‘संघातून बाहेर फेकल्यानंतर काही काळ मी क्रिकेटपासून दूर होतो. मित्र व इतर कामांमध्ये गुंतून राहिलो होतो. मात्र, माझ्याकडे अजून वेळ असून, मी स्वत:ला सिद्ध करू शकतो, ही जाणीव होती. सरावासाठी मी अगदी जिल्हा सामन्यातदेखील खेळत होतो. त्यामुळे भारतीय संघात पुनरागमनाची आशा होती. त्यानुसार अधिक चांगला खेळ करून मिळालेल्या संधीचे सोने करेन,’ अशी प्रतिक्रिया भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याने दिली.
फिरकीपटू रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त असल्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी जडेजाची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. जडेजाने रणजी सामन्यात सौराष्ट्र संघासाठी २४ गडी बाद केले असून, ९१ व ५८ धावांची दमदार खेळी करीत निवडसमितीचे लक्ष वेधून घेतले. जून महिन्यात बांगलादेश संघाबरोबर त्याने अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता.
या विषयी बोलताना जडेजा म्हणाला, ‘भारतीय संघात माझी निवड होणे हे काही माझ्या हातात नाही. मी सातत्याने आपला खेळ सुधारण्यासाठी प्रयत्न करीत होतो. रणजी स्पर्धेत त्या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे निवड समिती माझ्या नावाचा नक्कीच विचार करेल, याचा विश्वास होता. खरे तर रणजी सत्राची सुरुवात होण्यापूर्वी काही महिने मी मैदानाकडे फिरकलोसुद्धा नव्हतो. मित्र आणि फार्म हाऊसमध्ये माझा वेळ जात होता.’
‘रणजी सत्र सुरू होण्यापूर्वी महिनाभर मी सरावावर लक्ष केंद्रित केले. मला माझ्य ताकदीवरच संघात स्थान मिळवायचे आहे, अशी जाणीव होती. त्यासाठी जिल्हास्तरीय स्पर्धेतही खेळलो. त्याचा फायदा झाला,’ असे जडेजाने सांगितले. (वृत्तसंस्था)