टार्गेट इंडोनेशिया ओपन

By Admin | Updated: December 1, 2015 03:18 IST2015-12-01T03:18:37+5:302015-12-01T03:18:37+5:30

मकाऊ ग्रांप्रीमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी करणारी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे.

Target Indonesia Open | टार्गेट इंडोनेशिया ओपन

टार्गेट इंडोनेशिया ओपन

नवी दिल्ली : मकाऊ ग्रांप्रीमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी करणारी भारतीय स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुखापतीतून सावरत शानदार पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद व्यक्त केला आहे. विश्व चॅम्पियनशिपमध्ये दोनदा कांस्यपदकाचा मान मिळणाऱ्या सिंधूला डेन्मार्क ओपनमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. डेन्मार्क ओपन स्पर्धेच्या निमित्ताने सुपर सीरिज स्पर्धेत तिने प्रथमच अंतिम फेरी गाठली होती. याव्यतिरिक्त सिंधूने मकाऊ ओपनमध्ये मोसमातील पहिले जेतेपद पटकावले.
हैदराबादच्या या २०वर्षीय खेळाडूने आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या इंडोनेशिया मास्टर्स ग्रांप्री गोल्ड स्पर्धेवर लक्ष्य केंद्रित केले आहे. सिंंधू म्हणाली, ‘हा चांगला विजय आहे. मला आनंद झाला. आता माझे पुढचे लक्ष्य इंडोनेशिया आहे. मकाऊमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी करता आली. एकूण विचार करता माझी कामगिरी चांगली झाली. मितानी चांगली खेळाडू आहे. जपान ओपनमध्ये तिच्याविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. तिचा पराभव करण्यात यश आल्यामुळे आनंद झाला.’
सिंधू पुढे म्हणाली, ‘मला दुसरा गेम जिंकण्याची संधी होती; पण मोक्याच्या क्षणी दोन स्मॅश नेटमध्ये गेल्यामुळे निराश झाले. तिसऱ्या गेममध्ये आघाडी मिळवीत अखेरपर्यंत कायम राखली.’
स्टेडियमबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘प्रत्येक वेळी शटलचा वेध घेणे अचडणीचे ठरत होते. सर्वांसाठी सारखीच परिस्थिती असल्यामुळे आम्ही तक्रार करू शकत नाही.’
आगामी सत्राबाबत बोलताना सिंधू म्हणाली, ‘जानेवारी महिन्यात लीग स्पर्धेत सहभागी व्हायचे आहे. त्यानंतर सैयद मोदी, इंडियन ओपन, आदी स्पर्धेत सहभागी होणार आहे. आॅलिम्पिकचे वर्ष असल्यामुळे प्रत्येक स्पर्धा महत्त्वाची आहे. कामगिरीचा आलेख उंचाविण्यात यश येईल, अशी आशा आहे.
यंदाच्या मोसमात सिंधूला कामगिरीमध्ये चढ-उतार अनुभवावे लागले. पायाच्या दुखापतीमुळे तिला आॅल इंग्लंड चॅम्पियनशिप आणि इंडिया ओपन यासारख्या अनेक महत्त्वांच्या स्पर्धांना मुकावे लागले. पुनरागमन करताना आॅस्ट्रेलिया, इंडोनेशिया आणि चीन ताइपे स्पर्धांमध्ये तिला लवकरच गाशा गुंडाळावा लागला. सिंधूने आॅलिम्पिक चॅम्पियन शुरुईचा पराभव केला; पण जपानच्या मितानीविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर पुनरागमन करताना डेन्मार्क ओपनमध्ये अंतिम फेरी गाठली.
डेन्मार्कमध्ये कारकिर्दीत प्रथमच सुपर सीरिजचा अंतिम सामना खेळला. मकाऊमध्ये जेतेपदाचा मान मिळविला. सिंधू म्हणाली, ‘आघाडी मिळविल्यानंतर पराभव स्वीकारणे दु:खद असते. अनेक लढतींमध्ये याचा अनुभव आला. दुखापत कारकिर्दीचा एक भाग असतो. त्यावर नियंत्रण राखता येत नाही. मला तीन-चार महिने खेळता आले नाही. अशा स्थितीत संयम राखणे आवश्यक ठरते. पुनरागमन करण्यासाठी प्रतीक्षा
करावी लागते. पुनरागमन करण्यात यशस्वी ठरल्यामुळे आनंद झाला.’ (वृत्तसंस्था)

महासंघातर्फे गौरविण्यात येणार
दरम्यान, भारतीय बॅडमिंटन महासंघाने मकाऊ ओपनमध्ये जेतेपद पटकावणाऱ्या पी. व्ही. सिंधूला १० लाख रुपयांचा रोख पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे. जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने सहावे मानांकन असलेल्या जपानाच्या मिनात्सू मितानीचा २१-९, २१-२३, २१-१४ ने पराभव करीत मकाऊ ओपनमध्ये जेतेपदाची हॅट््ट्रिक साजरी केली. बाईचे अध्यक्ष अखिलेश दासगुप्ता म्हणाले, ‘सिंधूने पुन्हा एकदा आम्हाला आनंद साजरा करण्याची संधी प्रदान केली. जेतेपद राखण्यात ती यशस्वी ठरेल, याचा आम्हाला विश्वास होता. तिने आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. आम्हाला तिच्या कामगिरीचा अभिमान असून, भविष्यात ती आणखी स्पर्धांमध्ये जेतेपद पटकाविण्यात यशस्वी ठरेल, अशी आम्हाला आशा आहे.’

Web Title: Target Indonesia Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.