भारताचे लक्ष्य बरोबरीचे
By Admin | Updated: October 11, 2014 04:31 IST2014-10-11T04:31:04+5:302014-10-11T04:31:04+5:30
भारत आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावर दिवस-रात्र सामना रंगणार आहे.

भारताचे लक्ष्य बरोबरीचे
नवी दिल्ली : पहिल्या वन-डे सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारणारा यजमान भारतीय संघ वेस्ट इंडीजविरुद्ध उद्या, शनिवारी खेळल्या जाणा-या दुस-या लढतीत चमकदार कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. पहिल्या सामन्यातील झालेल्या चुका सुधारण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील आहे. भारत आणि वेस्ट इंडीज संघांदरम्यान शनिवारी फिरोजशहा कोटला मैदानावर दिवस-रात्र सामना रंगणार आहे.
विजयाचा प्रबळ दावेदार म्हणून गणल्या जाणाऱ्या भारतीय संघाला कचखाऊ फलंदाजीमुळे पहिल्या सामन्यात १२४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विंडीज प्लेअर्स असोसिएशन आणि विंडीज बोर्ड यांच्यादरम्यान वेतनाच्या मुद्द्यावरील वादामुळे विंडीज संघ मालिकेवर बहिष्कार टाकण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना पहिला सामना खेळण्यात आला. कॅरेबियन खेळाडूंनी हा वाद विसरून चमकदार कामगिरी केली.
विंडीज संघाने स्टार खेळाडू ख्रिस गेल व सुनील नरेन यांची उणीव भासू दिली नाही. गेल दुखापतीमुळे संघाबाहेर आहे, तर आॅफ स्पिनर नरेनचा संशयास्पद गोलंदाजी शैलीमुळे संघात समावेश करण्यात आलेला नाही.
फिरोजशाह कोटलावर विजय मिळवित मालिकेत बरोबरी साधण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. पुढील होणाऱ्या विश्वकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर कर्णधार महेंद्रसिंग धोनी संघाचे संतुलन साधण्यास प्रयत्नशील आहे. कोचीमध्ये भारतीय संघ १९७ धावांत गारद झाला असला तरी संघाचा फलंदाजी क्रम जवळजवळ निश्चित आहे. विराट कोहलीचा फॉर्म संघासाठी चिंतेचा विषय आहे. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराटच्या तंत्राबाबत उघडउघड चर्चा केली असून, विराटने सूर गवसण्यासाठी खालच्या क्रमांकावर फलंदाजी करावी, असा सल्ला दिला आहे.
संघात केवळ अंबाती रायडूचा अपवाद वगळता उर्वरित सर्व खेळाडूंचे स्थान पक्के आहे. रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे रायडूला संधी मिळाली आहे. रायडूला अद्याप छाप सोडता आलेली नाही. रोहित तंदुरस्त झाल्यानंतर तो निवडीसाठी उपलब्ध राहणार असून तोपर्यंत मिळालेल्या संधीचे सोने करण्यास रायडू प्रयत्नशील आहे.
भारतीय संघ सलामी जोडीबाबत चिंतेत आहे. पहिल्या सामन्यात भारतातर्फे सर्वाधिक धावा फटकाविणाऱ्या शिखर धवनमध्ये फटक्याची निवड करताना साशंकता असते. मुरली विजय ड्रेसिंग रूममध्ये असून उन्मुक्त चंद संधीची प्रतीक्षा करीत आहे. संघव्यवस्थापनाला धवनकडून चमकदार कामगिरीची आशा आहे.
गोलंदाजी भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. पहिल्या लढतीत भारतीय गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला ३२१ धावा बहाल केल्या. कोचीमध्ये फिरकीपटूंनी २२ षटकांमध्ये १४२ धावा दिल्या.
यजमान संघाला मायदेशात फिरकीपटूंकडून चमकदार कामगिरीची आशा आहे. धोनीने गोलंदाजांची पाठराखण केली असली तरी रवींद्र जडेजा व अमित मिश्रा यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही, हे विसरता येणार नाही. चायनामन गोलंदाज कुलदीप यादवला संधी मिळते का ? याबाबत उत्सुकता आहे. (वृत्तसंस्था)