तन्वीचा धक्कादायक विजय

By Admin | Updated: June 12, 2014 04:43 IST2014-06-12T04:43:45+5:302014-06-12T04:43:45+5:30

मुंबईकर तन्वी लाड हिने जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद केली

Tanvi's shocking victory | तन्वीचा धक्कादायक विजय

तन्वीचा धक्कादायक विजय

टोकीयो : मुंबईकर तन्वी लाड हिने जपान ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक निकालाची नोंद केली. तिने स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिलमोरचा एक तास रंगलेल्या लढतीत १३-२१, २१-११, २१-१७ असा पराभव केला. तन्वीने भारतीयांना या निकालाने दिलासा दिला असला तरी पुरुष एकेरीत के़ श्रीकांत आणि पी़ कश्यप या तगड्या खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला.
जागतिक क्रमवारीत ५९व्या स्थानावर असलेल्या तन्वीने ०-१ अशा पिछाडीवरून जोरदार मुसंडी मारीत १८व्या स्थानावर असलेल्या क्रिस्टीचे आव्हान मोडून काढले.
महिला एकेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणारी तन्वी ही एकमेव खेळाडू असून, सायना नेहवाल आणि पी़ व्ही़ सिंधू यांनी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महिला एकेरीत तन्वीवरच भारताची मदार असेल. तन्वीला पुढील सामन्यात चीनच्या ल्यू शिन हिच्याशी मुकाबला करावा लागेल. शिनने एप्रिलमध्ये चीन मास्टर्स ग्रांप्रि स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यामुळे तन्वीला ही लढत संघर्षाने जिंकावी लागेल.
पुरुष एकेरीत सौरभ वर्मा याने कडव्या झुंजीनंतर हाँगकाँगच्या नान वेई याला १९-२१, २१-१४, २२-२० असे पराभूत केले. त्याला पुढील लढतीत चौथ्या मानांकित जपानच्या केनीची टँगो आणि कोरियाच्या डाँग क्युन ली यांच्यातील विजेत्याशी मुकाबला करावा लागेल.
याच गटात श्रीकांतला जर्मनीच्या मार्क ज्वेबलरकडून पराभव पत्करावा लागला. थॉमस उबेर चषकात झालेल्या पराभवाची परतफेड करताना ज्वेबलरने ही लढत १८-२१, २१-१३, २१-८ अशी जिंकली. रिची ताकेशिताने कश्यपला १५-२१, २५-२३, २१-१८ असे पराभूत केले. (वृत्तसंस्था)

Web Title: Tanvi's shocking victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.