‘स्विमवंडरबॉय’ आर्यन!
By Admin | Updated: April 17, 2016 02:20 IST2016-04-17T02:20:06+5:302016-04-17T02:20:06+5:30
देशात जलतरणाच्या क्षेत्रात बंगळुरूचा दबदबा असला, तरी महाराष्ट्र सध्या बंगळुरूला कडवी टक्कर देत आहे. मुंबईसह आपल्या राज्यातील जलतरणपटू राष्ट्रीय स्तरावर छाप पाडत आहेत. आर्यन भोसले

‘स्विमवंडरबॉय’ आर्यन!
- महेश चेमटे
देशात जलतरणाच्या क्षेत्रात बंगळुरूचा दबदबा असला, तरी महाराष्ट्र सध्या बंगळुरूला कडवी टक्कर देत आहे. मुंबईसह आपल्या राज्यातील जलतरणपटू राष्ट्रीय स्तरावर छाप पाडत आहेत. आर्यन भोसले या उदयोन्मुख जलतरणपटूंपैकी एक. अल्पावधीत आर्यनने राष्ट्रीय स्तरावर चांगले नाव कमावले आहे. त्याच्याकडून आता जलतरण क्षेत्राला मोठी आशा आहे.
सुट्टीत कोल्हापूर या आपल्या गावी गेल्यानंतर वडील बाबासाहेब यांची नजर चुकवत कोवळ््या वयात आर्यनला दिवसभर पंचगंगेत डुंबण्याचा छंद जडला होता. आजोबांचा पोहण्याचा वसा वडिलांनी आणि पुढे आर्यनने जपण्याचे जणू लहानपणापासूनच ठरवले होते. त्यात २००५ मधील मुंबईत आलेल्या प्रलयाचा अनुभव आर्यनच्या वडिलांनी घेतला होता. त्यामुळे किमान जीव वाचवता यावा, या उद्देशाने आर्यनला पोहणे शिकवण्याची खूणगाठ त्यांनी बांधली. त्याची पोहण्यातील गती आणि आवड पाहून मुंबईतील फॉरेस्ट क्लबमध्ये त्याला दाखल केले.
मुळातच जलतरणपटूसाठी आवश्यक असलेले गुण आर्यनमध्ये असल्याने मुंबईत सराव त्याच्यासाठी पूरक ठरला. आंतरक्लब, आंतरशालेय स्थानिक अशा विविध स्तरांवरील स्पर्धांमध्ये त्याची चुणूक दिसू लागली. काही स्पर्धांवेळी तर ‘अरे हा तर जंगलातून आलाय, फॉरेस्टमधून,’ असे टोमणे त्याला मारले जाऊ लागले, पण खचून न जाता त्याने तरणतलावातील कामगिरीने टोमण्यांना उत्तरे दिली. आर्यन नियमितपणे सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन सत्रांत सराव करतो. सकाळच्या
सत्रात त्याच्या वयोगटांतील मुलांसोबत तर संध्याकाळी १६ आणि १८
वयोगटांतील मुलांमध्ये तो सरावात मग्न असतो. या सरावाच्या वेळी तो नेहमीच उजवा ठरतो.
उत्कृष्ट जलतरणपटू होण्यासाठी शारीरिक क्षमता, उंची, प्रतिकार शक्ती आणि महत्त्वाचे म्हणजे पाण्यात तग धरण्याची क्षमता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. जलतरणपटूचा डाएट प्लॅनदेखील महत्त्वाचा ठरतो. पोहणे हा सर्वांगसुंदर व्यायाम मानला जातो. आर्यनची उंची त्याच्या वयामानाने सरस होती. कोल्हापूरचा गडी असल्याने शारीरिक ठेवणदेखील आकर्षक होतीच. नदीत पोहण्याचे बाळकडू मिळाल्याने तरणतलावात पोहणे त्याला तुलनेने सोपे झाले. योग्य-उत्तम मार्गदर्शन आणि मेहनत करण्याच्या सवयीमुळे आर्यन पोहण्याच्या स्पर्धांतील एकेक टप्पा यशस्वीपणे ओलांडत होता. १०० मीटर, ४०० मीटर फ्रिस्टाईल या प्रकारात आर्यनने छाप सोडली. त्यानंतर दीर्घ पल्ल्याच्या जलतरणासाठी आर्यन सज्ज झाला. एका महिन्याचे ‘बेसिक ट्रेनिंग’नंतर ‘अॅडव्हान्स ट्रेनिंग’ आणि ‘सुपर अॅडव्हान्स ट्रेनिंग’त्याने पूर्ण केले.
ब्रेस्टस्ट्रोक, बॅकस्ट्रोक, फ्रिस्टाईल, बटरफ्लाय या सगळ््यांचा त्याने कठोर सराव केला. स्थानिक, जिल्हा, राज्य पातळीवरील चमकदार कामगिरीनंतर सब-ज्युनियर नॅशनल स्पर्धा आर्यनसाठी माईलस्टोन ठरली. निवडफेरीत आठवे स्थान मिळवलेल्या आर्यनने अंतिम फेरीत मात्र, दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. सध्याच्या घडीला आर्यन राज्यातील सर्वोत्कृष्ट जलतरणपटू असल्याचे प्र्रशिक्षक रेड्डी यांनी सांगितले.
जलतरणपटू होणे तसे ‘महाग’च आहे. या खेळासाठी लागणारे कपडे, साहित्यही खर्चिक आहे. जलतरणाचे चांगल्या दर्जाचे कपडे दोन ते तीन हजारांपर्यंत मिळतात. चांगल्या दर्जाच्या स्विमिंग गॉगलसाठी आठशे ते हजार रुपये मोजावे लागतात.
जलतरणच्या प्रसार प्रसारासाठी शालेय स्तरावर काम होणे गरजेचे आहे. अन्य क्षेत्रांनीदेखील थोडी मेहेरनजर जलतरणाकडे वळवली, तर ‘जलतरणपटूंची नगरी मुंबापुरी’ अशी ओळख मुंबईला मिळू शकते.
आॅलिम्पियन वीरधवल खाडेनंतर आर्यनमध्ये महाराष्ट्राचा झेंडा अटकेपार फडकवण्याची क्षमता दिसून येते. अनेक गुणवान खेळाडू पुरेशा आर्थिक पाठबळाअभावी पुढे येऊ शकत नाहीत. भूतकाळातील चुकांनी धडा घेत, वर्तमान जगणाऱ्याला भविष्याची चिंता नसते, पण या सगळ््यात लोकाश्रय मिळालेल्या जलतरणाला राजाश्रय मिळेल का? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहतो.
सब-ज्युनियर स्पर्धेत ५ पदके मिळवली
ग्रेटर मुंबई अमॅच्युअर अॅक्वेटिक असोसिएशनतर्फे आयोजित जलतरणस्पर्धेसाठी आर्यन सराव करत होता. जिल्हास्तरीय अडथळा पार केल्यानंतर, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील पदक त्याला खुणावत होते. सराव ऐन रंगात असताना तत्कालीन प्रशिक्षकांनी आर्यनला एका संध्याकाळी थेट सराव करण्यास बंदी घातली.
आपल्यापेक्षा जास्त वयाच्या जलतरणपटूंना पराभूत करत असल्याने त्याच्याबाबत हा प्रकार घडला. आता पुढे काय करायचे? याच प्रश्नाने आर्यनला झोप येणे कठीण झाले. दुसऱ्या दिवशी प्रशिक्षक मोहन रेड्डी यांना हा सगळा प्रकार समजला. त्याचक्षणी रेड्डी यांनी आर्यनच्या प्रशिक्षणाची जबाबदारी उचलली.
त्यानंतर, खडतर सराव करून आर्यनने सब-ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण हॅट्ट्रिक घेत, तब्बल ५ पदकांना गवसणी घातली. आर्यनने प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला. तेव्हा आर्यनचे वय होते अवघे १२ वर्ष. त्यानंतर, आर्यनने मागे वळून पाहिलेच नाही.