विभागीय क्रीडा संकुलावर होणार जलतरण तलाव
By Admin | Updated: August 31, 2014 22:51 IST2014-08-31T22:51:17+5:302014-08-31T22:51:17+5:30
स्वीमिंग पुलाच्या ९० लाखांच्या प्रस्तावास मान्यता

विभागीय क्रीडा संकुलावर होणार जलतरण तलाव
स वीमिंग पुलाच्या ९० लाखांच्या प्रस्तावास मान्यताऔरंगाबाद : गारखेडा परिसरात असणार्या विभागीय क्रीडा संकुलात लवकरच जलतरण तलाव उभारला जाणार असून स्वीमिंग पूल उभारण्याच्या ९० लाख रुपयांच्या प्रस्तावास शासनाने मान्यता दिली आहे.क्रीडाधोरणातील शिफारशीनुसार क्रीडा सुविधांच्या निर्मितीसाठी आर्थिक साह्य या योजनेमध्ये विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समितीने जलतरण तलाव बांधकामासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाची शिफारस राज्याच्या क्रीडा विभागाकडे करण्यात आली होती. त्यानुसार क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे नुकतीच बैठक झाली. या बैठकीत विभागीय क्रीडा संकुलात जलतरण तलाव निर्माण करण्यासाठी तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. यासाठी शासनाने ९० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली. या प्रसंगी शालेय शिक्षण व क्रीडा विभागप्रमुख सचिव अश्विनी भिडे, क्रीडा व युवक सेवा आयुक्त पंकजकुमार आदी उपस्थित होते.औरंगाबाद विभागास एकूण ९२.५० लाख रुपयांच्या प्रस्तावास मान्यता देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. औरंगाबाद जिल्हा ज्युदो संघटनेच्या ज्युदो हॉल बांधकाम, मौलाना आझाद महाविद्यालयाच्या लॉन टेनिस कोर्टच्या निर्मितीसाठीही मंजुरी देण्यात आली.विभागीय क्रीडा संकुलातील जलतरण तलावाच्या प्रस्तावासाठी विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी क्रीडा विभागाकडे या जलतरण तलावासाठी मंजुरी प्राप्त करून घेण्यासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला, असे क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे यांनी सांगितले.विभागीय क्रीडा संकुलात पहिल्या टप्प्यात हाती घेतलेल्या सुविधा पूर्ण झाल्यानंतर शहरातील क्रीडाप्रिय नागरिक व खेळाडूंच्या सातत्याने होणार्या मागणीचा पाठपुरावा विभागीय क्रीडा संकुल समितीने केला होता. खेळाडू व नागरिकांच्या आग्रहास्तव विभागीय क्रीडा संकुलात जलतरण तलाव बांधकामासाठी प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर केला होता. आता लवकरच संकुलात जलतरण तलावाच्या बांधकामासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.