यासीर शाहवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2015 03:31 IST2015-12-28T03:31:31+5:302015-12-28T03:31:31+5:30
इंग्लंडविरुद्ध गेल्या महिन्यात वन-डे मालिकेदरम्यान डोप चाचणीत अपयशी ठरलेला पाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शाह याच्यावर आयसीसीने तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केली आहे.

यासीर शाहवर निलंबनाची कारवाई
दुबई : इंग्लंडविरुद्ध गेल्या महिन्यात वन-डे मालिकेदरम्यान डोप चाचणीत अपयशी ठरलेला पाकिस्तानचा फिरकीपटू यासीर शाह याच्यावर आयसीसीने तात्पुरत्या स्वरूपाची निलंबनाची कारवाई केली आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने स्पष्ट केले, की पाकिस्तानचा गोलंदाज यासीर शाह आयसीसीच्या डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन करण्याच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. यासीरची १३ नोव्हेंबर रोजी चाचणी घेण्यात आली होती. त्याच्या नमुन्यामध्ये बंदी असलेला पदार्थ ‘क्लोरटालिडोन’ असल्याचे दिसून आले. या पदार्थाचा वाडाच्या बंदी असलेल्या द्रव्यांच्या यादीमध्ये सेक्शन पाचमध्ये समावेश आहे. यासीरची ज्या दिवशी चाचणी घेण्यात आली, त्या दिवशी पाकिस्तान संघ अबुधाबी येथे इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामना खेळत होता.
आयसीसीने म्हटले आहे, की ‘आयसीसी डोपिंगविरोधी संहितेनुसार शिस्तपालन प्रक्रियेचा भाग म्हणून यासीरवर तात्पुरत्या स्वरूपाच्या निलंबनाची कारवाई करण्यात येत आहे.’ (वृत्तसंस्था)