ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ -भारताविरुद्धचा सामना जिंकल्यानंतर अश्लील हावभाव करत जल्लोष करणा-या पाकिस्तानी खेळाडूंपैकी दोघांना निलंबित करण्यात आले आहे. मौहम्मद तौसिक आणि अली अमजद अशी त्या दोघांची नावे असून जर्मनीविरुद्धच्या अंतिम सामन्यात ते दोघे खेळणार नाहीत.
चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकीच्या सेमिफायनल सामन्यात भारताविरूध्द ४-३ असा विजय मिळविताच पाकिस्तानच्या खेळाडूंनी मैदानात जल्लोष केला. मात्र काही खेळाडूंनी कोणतेही भान राखता त्यांनी मैदानावर शर्ट काढला तसेच प्रेक्षकांकडे पाहत अश्लिल हातवारेही केले. खेळाडूंच्या या वागण्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकीच्या प्रतिष्ठेलाही धक्का पोचला. याबाबत हॉकी इंडियाने तीव्र नाराजी नोंदवत खेळाडूंवर कारवाईची मागणी केली. व जोपर्यंत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत भारत पाकिस्तानवर बहिष्कार टाकेल असा इशारा हॉकी इंडियाचे अध्यक्ष नरेंद्र बत्रा यांवी दिला होता. त्यामुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरशनने कारवाईचे पाऊल उचलत दोन प्रमुख खेळाडूंना एका सामन्यासाठी बाहेर बसवले आहे. त्यामुळे आज जर्मनीविरुद्ध रंगणा-या महत्वाच्या सामन्यात ते खेळू शकणार नाहीत.