सरितादेवी कोचसह निलंबित
By Admin | Updated: October 23, 2014 00:50 IST2014-10-23T00:50:13+5:302014-10-23T00:50:13+5:30
कांस्यपदक स्वीकारण्यास नकार देणारी भारताची महिला बॉक्सर लैशराम सरितादेवी हिच्याविरुद्ध कठोर कारवाई म्हणून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) अस्थायी निलंबनाची कारवाई केली आहे.

सरितादेवी कोचसह निलंबित
नवी दिल्ली : इंचियोन आशियाडमध्ये रेफ्रीने वादग्रस्त निर्णय देऊन अन्याय केल्याच्या निषेधार्थ कांस्यपदक स्वीकारण्यास नकार देणारी भारताची महिला बॉक्सर लैशराम सरितादेवी हिच्याविरुद्ध कठोर कारवाई म्हणून आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग महासंघाने (एआयबीए) अस्थायी निलंबनाची कारवाई केली आहे.
सरिताचे कोच गुरुबक्षसिंग संधू, ब्लास इग्लेसियास फर्नांडिस आणि सागरमल दयाल यांच्यासह भारताचे पथकप्रमुख आदिल सुमारीवाला यांच्यावरही अस्थायी निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे एआयबीएने म्हटले आहे. या सर्वांना कुठलीही स्पर्धा, बैठक आणि आयोजनात पुढील सूचनेपर्यंत सहभागी होता येणार नाही. हे प्रकरण एआयबीएच्या शिस्तपालन समितीकडे समीक्षेसाठी पाठविण्यात आले आहे. याचा अर्थ असा, की सरिता, तिचे सर्व कोच आणि सुमारीवाला हे कोरियात होणाऱ्या एआयबीए महिला विश्व बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाहीत. सरिताने पदक वितरण सोहळ्यात पदक स्वत:कडे घेतल्यानंतर द. कोरियाची रौप्य विजेती जी ना पार्क हिला सोपविले. पार्कने रेफ्रीच्या खराब निर्णयामुळे सरिताला पराभूत केले होते. कोच संधू यांनी सरिता प्रकरणावर लवकर तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘आम्हाला एआयबीएची नोटीस मिळाली असून, सात दिवसांच्या आत उत्तर द्यायचे आहे.’’ (वृत्तसंस्था)