इंचियोन : उपांत्य फेरीच्या लढतीत तगड्या मलेशियाच्या ओंग बेंग ही याचा केवळ ४५ मिनिटांमध्ये धुव्वा उडवून अंतिम फेरीत प्रवेश करणा-या भारताच्या सौरव घोषालला ‘सुवर्ण’ने हुलकावणी दिली. आशियाई स्पर्धेत स्क्वॅशचे सुवर्ण पटकावून इतिहास घडविण्यासाठी सज्ज असलेल्या सौरवला २-० अशा आघाडीनंतरही त्याला कुवेतच्या अब्दुल्लाह अल्मेजायेनकडून पराभव पत्करावा लागल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय स्क्वॅशपटूसाठी ही ऐतिहासिक कामगिरी असली तरी सुवर्णपदक न जिंकल्याची सल सौरवच्या मनाला सतावत आहे. याव्यतिरिक्त अखेरची आशियाई स्पर्धा खेळणाऱ्या नेमबाज अभिनव बिंद्राने १० मीटर रायफल प्रकारात सांघिक व वैयक्तिक गटात कांस्यची भर घातली. वुशूत महिलांच्या ५२ किलो वजनी गटात सनातोई देवीला, तर पुरुषांच्या ६० किलो वजनी गटात नरेंद्र ग्रेवाल याला कांस्यवर समाधान मानावे लागले. आशियाई स्पर्धेतील भारताचे हे पहिले रौप्यपदक आहे. सामन्याच्या सुरुवातीपासून सौरवचे वर्चस्व दिसले. त्याने पहिले दोन सेट सहज जिंकून सुवर्णपदकाकडे आगेकूच केली, परंतु एकाएकी अब्दुल्लाने सामन्यात कमबॅक केले. ६५ मिनिटे चाललेल्या या लढतीत अब्दुल्लाने १०-१२, २-११, १४-१२, ११-८, ११-९ अशी बाजी मारली. पहिले दोन सेट सहज खिशात घातल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये १२-११ असे आघाडीवर असूनही सौरवला सुवर्णपदकासाठीचा गुण पटकावता आला नाही. अब्दुल्लाने दमदार खेळ करून हा सेट १४-१२ असा जिंकला आणि स्पर्धेतील आव्हान कायम राखले. या एका सेट विजयामुळे अब्दुल्लाचे मनोबल इतके उंचावले की त्याने पुढील दोन्ही सेट सहज जिंकले. या पराभवामुळे सौरव इतका चिडला की त्याने कोर्टवर रॅकेट जोरदार आदळले.
सौरवला ‘सुवर्ण’ची हुलकावणी!
By admin | Updated: September 24, 2014 04:11 IST