आॅसींचा १३६ धावांत सफाया
By Admin | Updated: July 30, 2015 01:26 IST2015-07-30T01:26:16+5:302015-07-30T01:26:16+5:30
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने लॉर्ड्स येथील सुमार कामगिरीची उणीव भरून काढताना आज येथे ४७ धावांत ६ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लंडने

आॅसींचा १३६ धावांत सफाया
बर्मिंगहॅम : वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने लॉर्ड्स येथील सुमार कामगिरीची उणीव भरून काढताना आज येथे ४७ धावांत ६ गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीच्या बळावर इंग्लंडने तिसऱ्या अॅशेज कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलियाला पहिल्याच दिवशी १३६ धावांत गारद करण्यात यश मिळवले. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसअखेर ३ बाद १३३ धावा केल्या. ते अजूनही ३ धावांनी पिछाडीवर असून, त्यांचे ७ फलंदाज बाकी आहेत. पावसाचा व्यत्यय आल्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा जो रुट ३0 व जॉने बेअरस्टॉ १ धावेवर खेळत होते. इंग्लंडने इयान बेल (५३), लिथ (१0) व अॅलेस्टर कुक (३४) हे तीन फलंदाज गमावले आहेत. आॅस्ट्रेलियाकडून लियोनने ३ धावांत २ गडी बाद केले.
तत्पूर्वी, अँडरसनने लॉर्ड्स येथील दुसऱ्या कसोटीत १३७ धावा मोजल्या होत्या आणि त्याचे बळींचे खातेही कोरे होते; परंतु आज त्याने भेदक मारा करताना इंग्लंडची स्थिती मजबूत केली. एक वेळ तर त्याने अवघ्या १0 चेंडू आणि ७ धावांच्या आतच ४ गडी बाद केले होते. अँडरसनला दोन वर्षांनंतर कसोटीत पुनरागमन करणाऱ्या वेगवान गोलंदाज स्टिव्हन फिन (३८ धावांत २ बळी) आणि स्टुअर्ट ब्रॉड (४४ धावांत २ बळी) यांनी चांगली साथ दिली. इंग्लंडचा कर्णधार अॅलेस्टर कुक याने फक्त या तीनच गोलंदाजांचा उपयोग केला. आॅस्ट्रेलियाकडून फक्त सलामीवीर ख्रिस रॉजर्सच झुंजार फलंदाजी करू शकला. त्याने आठव्या फलंदाजाच्या रूपात बाद होण्याआधी ५२ धावा केल्या. यासाठी त्याने ८९ चेंडूंचा सामना केला आणि ९ चौकार मारले. अन्य पाच फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले; परंतु त्यात अॅडम वोजेस (१६) याचा स्कोअर सर्वांत जास्त होता. त्याआधी ढगाळ हवामानातही नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आॅस्ट्रेलियाने डेव्हिड वॉर्नर (२), लॉडर््स कसोटीत द्विशतक ठोकणारा स्टिव्हन स्मिथ (७), कर्णधार मायकल क्लार्क यांना पहिल्या तासाच्या खेळातच गमावले. उपाहारापर्यंत आॅस्ट्रेलियाची ३ बाद ७२ अशी स्थिती होती.
मार्क वूड याच्या जागी समावेश करण्यात आलेल्या फिनने पावसाचा व्यत्यय येण्याआधी आॅस्ट्रेलियाच्या गोटात सनसनाटी निर्माण केली. त्याने तीन षटकांत ६ धावांच्या आतच स्मिथ आणि क्लार्कला तंबूत धाडले.
इंग्लंडला पहिले यश जेम्स अँडरसनने डावाच्या तिसऱ्या षटकात वॉर्नरला पायचीत करून मिळवून दिले. त्याचा हा ४0७ वा कसोटी बळी ठरला. पहिला बदल म्हणून आलेल्या फिनने त्याच्या पहिल्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर जागतिक क्रमवारीत नंबर वनवर असणारा कसोटी फलंदाज स्मिथला पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असणाऱ्या अॅलेस्टर कुककरवी झेलबाद केले. त्यानंतर क्लार्कचा त्रिफळा उडवताना आॅस्ट्रेलियाची ३ बाद ३४ अशी स्थिती केली. वोजेसने काही वेळपर्यंत रॉजर्सला साथ दिली; परंतु उपाहारानंतर तोही तंबूत परतला. अँडरसनने त्याच्या सलग चार षटकांत विकेट्स मिळवल्या. त्याने प्रथम वोजेसला यष्टिरक्षक बटलरकरवी झेलबाद केले आणि नंतर पुढच्या षटकात नवीन फलंदाज मिशेल मार्शलाही असेच बाद केले. मार्शला भोपळाही फोडता आला नाही.
त्यानंतर ब्रॅड हॅडिनऐवजी पसंती मिळालेला पीटर नेविलही फलंदाजीत कमाल करू शकला नाही. अँडरसनने त्याला त्रिफळाबाद केले आणि मिशेल जॉन्सन (३) याला बाद करीत त्याचा पाचवा बळी मिळवला. त्याने
नाथन लियोन (११) याला बाद
करीत आॅस्ट्रेलियाच्या डावाला पूर्णविराम दिला.(वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : ३६.४ षटकांत सर्वबाद १३६.
(रॉजर्स ५२, वोजेस १६. जेम्स अँडरसन ६/४७, स्टुअर्ट ब्रॉड २/४४, स्टीव्हन फिन २/३८). इंग्लंड : पहिला डाव : २९ षटकात ३ बाद १३३. (इयान बेल ५३, जो रुट खेळत आहे ३0, अॅलेस्टर कुक ३४. लियोन २/३, हेजलवूड १/५0).