ईशांतच्या आक्रमकतेचे विराटकडून समर्थन
By Admin | Updated: September 2, 2015 23:45 IST2015-09-02T23:45:35+5:302015-09-02T23:45:35+5:30
तब्बल २२ वर्षांनंतर श्रीलंकेला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीत पराभूत करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ईशांत शर्माच्या आक्रमकतेचे समर्थन केले आहे

ईशांतच्या आक्रमकतेचे विराटकडून समर्थन
कोलंबो : तब्बल २२ वर्षांनंतर श्रीलंकेला कसोटी मालिकेत त्यांच्याच भूमीत पराभूत करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने ईशांत शर्माच्या आक्रमकतेचे समर्थन केले आहे. गोलंदाजांनी आक्रमक असणे
ही कोणत्याही कर्णधारासाठी आनंदाची गोष्ट आहे, असे त्याने म्हटले आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत ईशांत शर्माने खूप चांगली कामगिरी केली; मात्र यजमान संघाच्या खेळाडूंबरोबर वाद घातल्यामुळे त्याच्यावर दोनदा कारवाई करण्यात आली. मात्र, विराट कोहलीने त्याचे समर्थनच केले आहे. गोलंदाजांनी आक्रमकच असायला हवे, ही आक्रमकताच विरुद्ध संघाच्या फलंदाजांना बाद करण्यासाठी आवश्यक असते, असे विराटचे म्हणणे आहे.
विराट म्हणाला, ‘‘ईशांतने झोकून देऊन गोलंदाजी केली. त्यामुळेच महत्त्वाच्या वेळी आम्हाला बळी मिळविता आले. आपल्या संघात आक्रमक गोलंदाज असणे हे कोणत्याही कर्णधाराला सुखावणारी गोष्ट असते.’ विराटने यावेळी मालिकावीर आर. अश्विनचीही स्तुती केली. आश्विनने मालिकेत कमालीची गोलंदाजी केली. त्याने मोक्याच्या वेळी बळी घेतले.(वृत्तसंस्था)