खेळातही देश ‘सुपर पॉवर’ व्हावा : राजनाथसिंह
By Admin | Updated: April 3, 2015 00:29 IST2015-04-03T00:29:45+5:302015-04-03T00:29:45+5:30
भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.

खेळातही देश ‘सुपर पॉवर’ व्हावा : राजनाथसिंह
बेंगळुरू : भारताने केवळ आर्थिक क्षेत्रातच नव्हे, तर खेळातही ‘सुपर पॉवर’ व्हावे, अशी इच्छा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केली आहे.
येथील एका स्टेडियमचे उद्घाटन केल्यानंतर गृहमंत्री म्हणाले, ‘‘२१व्या शतकाचा विकास भारताशी संलग्न आहे. वैश्विक स्तरावर स्वत:चा बलाढ्यपणा सिद्ध करायचा झाल्यास भारताने आर्थिक क्षेत्रासोबतच क्रीडाक्षेत्रातही सुपर पॉवर बनायला हवे. एक वेळ अशी होती, की भारताचे खेळाडू आॅलिम्पिक आणि विश्वस्पर्धेत भाग घेऊन पाचव्या-सहाव्या स्थानावर समाधान मानायचे; पण आता काळ बदलला आहे. भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये तब्बल सहा पदकांची कमाई केली.’’
आमच्या खेळाडूंमध्ये कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता आहे, हे वेळोवेळी त्यांनी दाखवून दिले. कौशल्याच्या बळावर कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची क्षमता भारतीय खेळाडूंमध्ये आली असल्याचे सांगून त्यांनी पाच वेळची विश्व चॅम्पियन बॉक्सर एम. सी. मेरी कोम तसेच बॅडमिंटनमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या सायना नेहवालचे उदाहरण दिले. या महिलांनी देशाचे नाव उंच केल्याने दृष्टिकोन बदलून खेळांना मदत करण्याची वेळ जवळ आली असल्याचे त्यांनी आवाहन केले.
कधीकाळी अभ्यासात हुशार असणे आणि परीक्षेत प्रावीण्य पटकावून अधिकारी बनण्यास अग्रक्रम दिला जायचा; पण सध्या खेळात करिअर घडवून मोठी झेप घेण्यास अग्रक्रम दिला जातो. भारतीय अर्थव्यवस्था झपाट्याने बदलत असल्यामुळे क्रीडाक्षेत्राला आर्थिक सुबत्ता लाभत आहे.
आधी पश्चिमी देश खेळात आर्थिकदृष्ट्या संपन्न होते; त्यामुळे मेडल घेण्यातही त्यांचा नंबर आधी होता. आता भारतीय खेळाडू पदकांच्या चढाओढीत पुढे दिसतात. केंद्र सरकारदेखील खेळांना अधिक प्रोत्साहन देत असल्याची माहिती गृहमंत्र्यांनी दिली. कॉर्पोरेट क्षेत्रानेही सामाजिक जबाबदारीच्या भूमिकेतून खेळांसाठी सहकार्याचा हात देण्याचे आवाहन त्यांनी केले. (वृत्तसंस्था)