सनरायजर्सची सरशी

By Admin | Updated: April 23, 2015 02:43 IST2015-04-23T02:43:31+5:302015-04-23T02:43:31+5:30

कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या झंझावाती ९१ धावानंतर गोलंदाजांनी केलेल्या चोख तसेच शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर पावसाच्या व्यत्त्ययातही सनरायजर्सने घरच्या

Sunrisers | सनरायजर्सची सरशी

सनरायजर्सची सरशी

विशाखापट्टणम : कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या झंझावाती ९१ धावानंतर गोलंदाजांनी केलेल्या चोख तसेच शिस्तबद्ध माऱ्याच्या बळावर पावसाच्या व्यत्त्ययातही सनरायजर्सने घरच्या मैदानावर आयपीएल-८ मध्ये बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सचा डकवर्थ-लुईस नियमांच्या आधारे १६ धावांनी पराभव केला.
सनरायजर्सचा डाव संपताच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दोन तास खोळंबा झाला. अखेर केकेआरला १२ षटकांत विजयासाठी ११८ धावांचे लक्ष्य आखून देण्यात आले होते. रॉबिन उथप्पाने २१ चेंडूंत ३४ धावा फटकावत केकेआरला अपेक्षित सुरुवातही करून दिली होती. यानंतर मनीष पांडेनेदेखील २४ चेंडूंत नाबाद ३३ आणि युसूफ पठाणने सात चेंडूत सहा धावा केल्या; पण जलद धावा काढण्यात अपयश येताच केकेआरला ४ बाद १०१ पर्यंतच मजल गाठता आली. केकेआरकडून अखेरच्या तीन षटकांत एकच चौकार लागला. सनरायजर्सचा पाचव्या सामन्यात हा दुसरा विजय होता. केकेआरचे देखील पाच सामने झाले असून त्यांचा दुसरा पराभव आहे.
तत्पूर्वी कोलकाता नाईट राईडर्सचा कर्णधार गौतम गंभीरने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सनराईझर्सची आघाडीची जोडी शिखर धवन व कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांनी सलामीला १३० धावांची भागीदारी करून संघाचा पाया भक्कम रचला. धवनने ४६ चेंडंूत ५४ धावा ठोकल्या. दोघांच्या खेळीमुळे सनराइजर्स २०० चा आकडा गाठेल असे वाटत होते; पण वॉर्नर बाद होताच धावगती मंदावली. अखेरच्या सहा षटकांत सनराइजर्सला ५१ धावा करता आल्या आणि त्यांनी ४ गडी गमावले. केकेआरकडून मोर्ने मोर्केल सर्वांत प्रभावी ठरला. त्याने ३१ धावा देऊन २ गडी बाद केले; पण सुनील नरेनने निराशा केली. त्याने ४ षटकांत ३८ धावा मोजल्या.
वॉर्नर-धवन यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या सहा षटकांत ४३ धावा केल्या. यानंतर वॉर्नरने युसूफ पठाण, उमेश यादव आणि नरेन यांना टार्गेट केले. वॉर्नरला आयपीएलमधील तिसरे आणि सनराइजर्ससाठी पहिले शतक ठोकण्याची संधी होती; पण तो अपयशी ठरला. डेथ ओव्हरमध्ये गंभीरने मोर्केलकडे चेंडू सोपविताच धावांवर अंकुश लागला. रवी बोपारा (२) लवकर बाद झाला. नमन ओझा याने ८ चेंडूंवर १८ धावा केल्याने १७० धावा फळ्यावर लागल्या.(वृत्तसंस्था)

Web Title: Sunrisers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.