सनरायजर्स विजयी

By Admin | Updated: April 10, 2017 01:28 IST2017-04-10T01:28:34+5:302017-04-10T01:28:34+5:30

अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानच्या अचूक माऱ्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मोएजेस हेन्रिक्स

Sunrise won | सनरायजर्स विजयी

सनरायजर्स विजयी

हैदराबाद : अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानच्या अचूक माऱ्यानंतर कर्णधार डेव्हिड वॉर्नर व मोएजेस हेन्रिक्स यांच्या वैयक्तिक अर्धशतकांच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने रविवारी गुजरात लायन्सचा ९ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या दहाव्या पर्वात सलग दुसरा विजय नोंदवला.
हैदराबादने गुजरात संघाचा डाव ७ बाद १३५ धावांत रोखला आणि विजयासाठी आवश्यक धावा १५.३ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या. सलामी लढतीत आरसीबीला पराभूत करणाऱ्या सनरायजर्स संघाचा या स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. वॉर्नरने ४५ चेंडूंना सामोरे जाताना ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७६ धावा करीत सूर गवसल्याचे संकेत दिले. त्याने हेन्रिक्ससोबत (नाबाद ५२ धावा, ३९ चेंडू) दुसऱ्या विकेटसाठी १०८ धावांची अभेद्य भागीदारी केली. सलामी लढतीत कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध पराभव स्वीकारणाऱ्या लायन्स संघाला सनरायजर्सविरुद्ध आतापर्यंत सर्व चारही लढतींमध्ये पराभव स्वीकारावा लागला आहे.
कर्णधार सुरेश रैनाने लायन्सच्या गोलंदाजीची सुरुवात करण्याचा जुगार खेळला, पण त्याच्या दुसऱ्या षटकात ३ षटकार ठोकल्या गेल्यामुळे त्याचा हा डाव अपयशी ठरला. शिखर धवन (९) याला प्रवीण कुमारने लवकर माघारी परतवले, पण रैनाच्या गोलंदाजीवर दोन षटकार ठोकणाऱ्या वॉर्नरने आक्रमक पवित्रा कायम राखला. त्याला हेन्रिक्सची योग्य साथ लाभली. सनरायजर्सने पॉवरप्लेमध्ये ६ षटकांत १ गडी गमावत ५९ धावा वसूल केल्या.
त्याआधी, अफगाणिस्तानचा लेग स्पिनर राशिद खानच्या अचूक माऱ्याच्या जोरावर सनरायजर्स हैदराबाद संघाने गुजरात लायन्सचा डाव ७ बाद  १३५ धावांत रोखला. राशिदने ४ षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. (वृत्तसंस्था)

धावफलक
गुजरात लायन्स :- जेस रॉय झे. धवन गो. भुवनेश्वर ३१, ब्रॅन्डन मॅक्युलम पायचित गो. राशिद ०५, सुरेश रैना पायचित गो. राशिद ०५, अ‍ॅरोन फिंच पायचित गो. राशिद ०३, दिनेश कार्तिक झे. ओझा गो. नेहरा ३०, ड्वेन स्मिथ झे. विजय शंकर (बदली खेळाडू) गो. भुवनेश्वर ३७, धवल कुलकर्णी धावबाद ३१, प्रवीण कुमार नाबाद ०७, बासिल थंपी नाबाद १३. अवांतर (३). एकूण २० षटकांत ७ बाद १३५. गोलंदाजी : बिपुल शर्मा ४-०-२४-०, भुवनेश्वर ४-०-२१-२, नेहरा ४-०-२७-१, राशिद ४-०-१९-३, कटिंग ३-०-२९-०, हेन्रिक्स १-०-१२-०.
सनरायजर्स हैदराबाद :- डेव्हिड वॉर्नर नाबाद ७६, शिखर धवन झे. मॅक्युलम गो. प्रवीण ०९, मोएजेस हेन्रिक्स नाबाद ५२. अवांतर (३). एकूण १५.३ षटकांत १ बाद १४०. गोलंदाजी : रैना २-०-२४-०, प्रवीण २-०-१६-१, बारोका ३.३-०-३३-०, कुलकर्णी २-०-१७-०, कौशिक ४-०-२९-०, थम्पी २-०-२१-०.

Web Title: Sunrise won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.