सुंदर रमण यांचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2015 01:45 IST2015-11-04T01:45:20+5:302015-11-04T01:45:20+5:30
आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी कारवाई न करण्याच्या आरोपाला सामोरे जात असलेले इंडियन प्रीमिअर लीगचे(आयपीएल) मुख्य संचालन अधिकारी (सीओओ) सुंदर रमण

सुंदर रमण यांचा राजीनामा
मुंबई : आयपीएल २०१३ मध्ये स्पॉट फिक्सिंगप्रकरणी कारवाई न करण्याच्या आरोपाला सामोरे जात असलेले इंडियन प्रीमिअर लीगचे(आयपीएल) मुख्य संचालन अधिकारी (सीओओ) सुंदर रमण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यापूर्वी बीसीसीआयच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी संघटनेमध्ये पारदर्शिता आणण्यासाठी आखलेल्या योजनेमध्ये रमण यांची दखल घेतली नव्हती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी रमण यांना ३१ आॅक्टोबरपूर्वी पद सोडण्यास सांगितले होते आणि त्यांनी नकार दिल्यास त्यांना ९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या बोर्डाच्या वार्षिक आमसभेमध्ये पदावरून हटविण्यात येणार होते. नजीकच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रमण यांनी सोमवारी रात्री नागपूरमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांची भेट घेतली आणि पदाचा राजीनामा दिला. आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, की रमण यांनी बीसीसीआय अध्यक्षांकडे राजीनामा दिला व अध्यक्षांनी तो स्वीकारला. रमण सक्षम व्यक्ती असून, त्यांनी अनेक दिवसांपासून आयपीएलचा कार्यभार सांभाळला. त्यांनी दिलेल्या योगदानाची मी प्रशंसा करुन भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो. मुद््गल समितीने आपल्या अहवालामध्ये रमण यांच्या भूमिकेची चौकशी करण्याचा उल्लेख केला होता. पण, रमण यांच्यावर पद सोडण्याचे दडपण नव्हते, असे शुक्ला यांनी म्हटले आहे.
रमण यांना १५ नोव्हेंबरला लोढा समितीपुढे सादर व्हायचे आहे. या प्रकरणात याचिका दाखल करणारे आदित्य वर्मा यांनी रमण यांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचे स्वागत करताना यामुळे खेळाची प्रतिमा सुधारण्यास मदत मिळेल, असे म्हटले. सुरुवातीपासून आयपीएलशी जोडलेल्या रमण यांना २०१३ आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणासाठी टीकेला सामोरे जावे लागले होते. (वृत्तसंस्था)
श्रीनिवासन यांची गच्छंती; मनोहर यांची एंट्री!
गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) चेअरमन एन. श्रीनिवासन यांची खुर्ची धोक्यात असल्याचे संकेत मिळत आहे. बीसीसीआयचे नवे अध्यक्ष शशांक मनोहर लवकरच श्रीनिवासन यांचे स्थान घेऊ शकतात, अशी चर्चा आहे.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असताना आयपीएलच्या सहाव्या पर्वात जावई गुरुनाथ मयप्पनचा भ्रष्टाचारामध्ये समावेश आणि दुटप्पी भूमिकेच्या मुद्यावर आपले पद गमावणाऱ्या श्रीनिवासन यांना यंदा सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा निवडणूक लढविण्यास बंदी घातली होती.
तेव्हापासून बीसीसीआयच्या जास्तीत जास्त सदस्यांचा श्रीनिवासनच्या आयसीसी चेअरमनपदाला विरोध आहे. बोर्ड सदस्यांच्या मते शशांक मनोहर यांनी आता आयसीसीच्या चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारायला हवी. सध्याच्या परिस्थितीचा विचार करता मनोहर यांची सर्वानुमते निवड होणे अपेक्षित आहे.
९ नोव्हेंबरला होणाऱ्या वार्षिक बैठकीमध्ये मनोहर यांची आयसीसीचे नवे चेअरमन म्हणून निवड होऊ शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर यांनी यापूर्वी या पदासाठी इच्छा दर्शवली होती.
बीसीसीआय पद गमाविल्यानंतर श्रीनिवासन यांची विश्वासातील अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली.
मला कुठलेच दडपण दिसत नाही. अद्याप त्यांच्याविरोधात कुठली बाब समोर आलेली नाही. राजीनामा देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी निश्चितच सारासार विचार केलेला असावा.
- राजीव शुक्ला
शरद पवार-शशांक मनोहर भेटीला महत्त्व
नागपूर : शरद पवारांचे
नागपुरात रात्री ८.४५ वाजता आगमन झाले. तेथून ते थेट ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या घरी रवाना झाले. मनोहर यांनी अध्यक्षपदाची
सूत्रे स्वीकारल्यापासून ‘बीसीसीआय’मध्ये बदलाचे वारे सुरू झालेत. ‘आयपीएल’चे ‘सीओओ’ सुंदर रमण यांचा राजीनामा, ‘आयसीसी’च्या चेअरमनपदाची चाललेली चर्चा व पुढील आठवड्यात ‘बीसीसीआय’ची होणारी वार्षिक बैठक या पार्श्वभूमीवर पवार यांची मनोहर यांच्यासोबतची भेट महत्त्वाची मानण्यात येते. या वेळी पवार यांनी शशांक मनोहर यांच्या प्रकृतीचीदेखील विचारपूस केली.