बालपणीच्या स्वप्नपूर्तीकडे सुमितचे पाऊल

By Admin | Updated: June 2, 2014 06:54 IST2014-06-02T06:54:31+5:302014-06-02T06:54:31+5:30

सुमित पाटील याने बालपणापासून पाहिलेले स्वप्न येत्या १० जूनला पूर्ण होणार आहे.

Sumit's foot at the dream of childhood | बालपणीच्या स्वप्नपूर्तीकडे सुमितचे पाऊल

बालपणीच्या स्वप्नपूर्तीकडे सुमितचे पाऊल

विनय नायडू, मुंबई - सुमित पाटील याने बालपणापासून पाहिलेले स्वप्न येत्या १० जूनला पूर्ण होणार आहे. सहाव्या वर्षांपासून डोंगर दर्‍यात सायकल चालविण्याचा सराव करणार्‍या अलिबागच्या पाटीलने २९व्या वर्षी रेस अक्रॉस अमेरिका (आरएएएम) या स्पर्धेत स्थान पटकावले आहे. जवळपास तीन हजार माईल्सच्या (४.८०० किलोमीटर) या स्पर्धेत स्थान पटकावणारा तो तिसरा भारतीय आहे. ‘टुअर दी फ्रान्स’ या स्पर्धेसारखी असलेली आरएएएम ही स्पर्धा खेळाडूला स्वत:ची ताकद आणि क्षमता दाखविणारी आहे. सुमित वैयक्तिक गटात सहभागी होणार असून, तो १२ दिवस सायकल चालविणार असून, त्यात प्रती दिवस केवळ तीन तासांची विश्रांती घेणार आहे. रुईया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि मुंबई विद्यापीठातून एम.एससी. फिजिक्स करणारा पाटील सध्या युपीएससी परीक्षेचा अभ्यास करीत आहे. त्याने आरएएएममधील सहभागाबाबत उत्सुकता व्यक्त केली आहे. लडाखमधून २० दिवसांच्या सराव शिबिरातून तो नुकताच मुंबईत परतला आणि वरळीच्या रोटरी क्लबतर्फे आयोजित स्पर्धेत अभिनेता जॅकी श्रॉफ यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. तो उद्या, सोमवारी मध्यरात्री आरएएएम स्पर्धेकरिता कॅलिफोर्नियासाठी रवाना होणार आहे. या स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी उत्सुक असलेला सुमित म्हणाला, या स्पर्धेत मी माझे सर्वस्व झोकून देईन. या स्पर्धेत मला सहनशक्ती अजमावण्याची संधी आहे आणि यात यशस्वी ठरल्यास मी ही स्पर्धा पूर्ण करणारा पहिला भारतीय ठरणार आहे. छोट्या छोट्या शहरांमध्ये सायकल स्पर्धेत सहभाग घेणार्‍या सुमितने मार्च २०१३मध्ये आरएएएम स्पर्धेसाठी पात्रता मिळविली. त्याने उल्ट्रा बॉब, बंगलोर-उटी-बंगलोर ही ६०१ किलोमीटरची स्पर्धा २० मिनिटांची पेनल्टी मिळाल्यानंतरही ३० तास ५२ मिनिटांत पूर्ण केली. आरएएएममध्ये एन्ट्री मिळविण्यासाठी ३२ तास ३० मिनिटांची अट होती. सुमितला हे ध्येय गाठण्यासाठी त्याच्या मित्रांकडून आणि कुटुंबाकडून चांगली मदत मिळाली. या अमेरिकेच्या दौर्‍यात त्याच्यासह नऊ सदस्यांचा संघ असेल, ते सुमितच्या सर्व गरजांची काळजी घेणार आहेत. या संघाला मुंबईच्या रोटरी क्लबकडून आर्थिक मदतही मिळणार आहे. या स्पर्धेकरिता सुमितला जवळपास ४२ लाखांचा खर्च येणार आहे. आरएएएममध्ये सायकल चालविताना त्याच्यासह तीन सदस्यांचा संघ असेल, या दोन बॅक अप वाहन आणि एक मनोरंजक वाहनाचा समावेश आहे. सुमितने आपल्या या यशासाठी महाराष्ट्र राज्य विभागीय परिवहन मंडळाचे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी संदीप बिष्णोई यांचे विशेष आभार मानले. तो म्हणाला, राज्य परिवहन मंडळाच्या सेवेमुळेच मला सह्याद्रीच्या डोंगरांवर सराव करण्याची संधी मिळाली. मी याच्या साहाय्याने पुण्याजवळील तोरणा किल्ल्यावर जात असे आणि बिष्णोई सरांनी मला खूप सहाकार्य केले. त्यांनी मला प्रोत्साहन दिले.

Web Title: Sumit's foot at the dream of childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.