डेव्हिड बेकहॅमच्या पावलावर पाऊल टाकतोय
By Admin | Updated: November 7, 2015 03:18 IST2015-11-07T03:18:33+5:302015-11-07T03:18:33+5:30
ज्याप्रमाणे ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने येथे फुटबॉल खेळ लोकप्रिय केला, तशाच प्रकारे क्रिकेट आॅल स्टार्स ट्वेंटी-२० सिरीजद्वारे अमेरिकेत क्रिकेट खेळ लोकप्रिय करणार

डेव्हिड बेकहॅमच्या पावलावर पाऊल टाकतोय
न्यूयॉर्क : ज्याप्रमाणे ब्रिटिश फुटबॉलपटू डेव्हिड बेकहॅमने येथे फुटबॉल खेळ लोकप्रिय केला, तशाच प्रकारे क्रिकेट आॅल स्टार्स ट्वेंटी-२० सिरीजद्वारे अमेरिकेत क्रिकेट खेळ लोकप्रिय करणार असल्याचे मत आॅस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज शेन वॉर्न याने व्यक्त केले आहे.
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या साथीने येथे क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने पोहोचलेल्या वॉर्नने फुटबॉलचे उदाहरण देताना म्हटले, ‘‘फुटबॉल हा खेळ अमेरिकेत जास्त लोकप्रिय नव्हता; परंतु डेव्हिड बेकहॅम येथे आला आणि फुटबॉल खेळाला लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली. आम्ही अमेरिकेत क्रिकेट लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने येथे आलो आहोत. जेव्हा आम्ही येथे पुढच्या वेळेस येऊ, तेव्हा अमेरिकेच्या मुलांच्या हाती बेसबॉलप्रमाणेच क्रिकेटची बॅटदेखील पाहायला मिळेल.’’
अमेरिकेत फुटबॉल लोकप्रिय बनवण्याचे श्रेय बऱ्याच अंशी इंग्लंडचा माजी खेळाडू आणि मॉडेल डेव्हिड बेकहॅमला जाते. सचिन आणि वॉर्न येथे पुढील वर्षी स्टार्स ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार आहेत. त्यात निवृत्ती घेतलेले अनेक खेळाडू असतील. सचिनच्या नेतृत्वाखालील ब्लास्टर्स संघात सौरव गांगुली, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण, ग्रॅमी स्वान, ब्रायन लारा, कर्टली हुपर, ग्लेन मॅकग्रा, शोएब अख्तर आणि मोईन खानसारख्या खेळाडूंचा समावेश असेल. तर, वॉर्न ‘वॉरियर्स’ संघात अजित आगरकर, जाँटी ऱ्होड्स, मॅथ्यू हेडन, कोर्टनी वॉल्श, अॅलन डोनल्ड, डॅनियल व्हेटोरी, रिकी पाँटिंग, वसीम अक्रम आणि मायकेल वॉनसारखे खेळाडू असतील. (वृत्तसंस्था)