राज्यस्तरीय कबड्डी : विजय क्लब, जॉली स्पोर्ट्स अमर क्रीडा मंडळ यांची विजयी सलामी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2020 11:24 PM2020-01-03T23:24:10+5:302020-01-03T23:26:04+5:30

जॉली स्पोर्टसने ठाण्याच्या स्व.आकाश क्रीडा मंडळावर ४३- १९अशी सहज मात केली.

State Level Kabaddi: Vijay Club, Jolly Sports, Amar krida mandal won 1st round | राज्यस्तरीय कबड्डी : विजय क्लब, जॉली स्पोर्ट्स अमर क्रीडा मंडळ यांची विजयी सलामी

राज्यस्तरीय कबड्डी : विजय क्लब, जॉली स्पोर्ट्स अमर क्रीडा मंडळ यांची विजयी सलामी

Next

मुंबई : विजय क्लब, जॉली स्पोर्ट्स, स्वस्तिक मंडळ, विजय नवनाथ, अमर क्रीडा मंडळ यांनी चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक पुरुष  राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजयी सलामी दिली.

श्री नूतन सोनार सिद्ध घाटाव या संघाला मात्र आज संमिश्र यश मिळाले. लालबाग-मुंबई येथील सदगुरु भालचंद्र महाराज क्रीडांगणावर सुरू झालेल्या उदघाटनिय सामन्यात मुंबई शहरच्या विजय क्लबने क गटात मुंबई उनगरच्या सत्यम सेवा मंडळाचे आव्हान ४३-२९ असे परतवून लावले. तर त्यानंतर झालेल्या सामन्यात शहरच्याच विजय बजरंग व्यायाम शाळेचा ३४-१० असा धुव्वा उडवीला आणि दुहेरी यश मिळवीत बाद फेरीतील आपले स्थान निश्र्चित केले. विजय क्लबने दोन्ही सामन्यात आक्रमक खेळ करीत सुरुवातीपासूनच आघाडी आपल्याकडे राखण्यात यश मिळविले.  अजिंक्य कापरे, अक्षय सोनी, सुनील पाटील, विजय दिवेकर, राज नाटेकर, अभिषेक रामाणे यांच्या सर्वांगसुंदर खेळाच्या जोरावर विजय क्लबने हे निर्भेळ यश मिळविले. सत्यमकडून दीपेश रामाणे, आशिष मोहिते, सचिन पाताडे यांनी विजय क्लबला बरी लढत दिली. दुसऱ्या सामन्यात विजय बजरंगचा आकाश निकम एकाकी लढला.

   फ गटात रायगडच्या श्री नूतन सोनारसिद्ध संघाने मुंबईच्या युवा स्पोर्ट्सला ३६-१८ असे नमविलें. भारत मालुसरे, अनिकेत ठमके, दीपक भोकरे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर सोनारसिद्धने विश्रांतीलाच १८-०८अशी महत्वपूर्ण आघाडी घेतली. विश्रांतीनंतर तोच जोश कायम ठेवत विजय साकारला. युवाकडून प्रवीण दुबे एकाकी झुंजला. रायगडकरांचा या विजयाचा आनंद फार काळ टिकला नाही. यानंतर झालेल्या सामन्यात मुंबई शहरच्या अमर क्रीडा मंडळाने श्री नूतन सोनारसिद्ध मंडळाला २२-१६ असे नमविलें. मध्यांतरापर्यंत एकमेकांचा अंदाज घेत चुरशीने खेळलेल्या या सामन्यात दोन्ही संघ ७-७ असे बरोबरीत होते. विश्रांतीनंतर अमरच्या शुभम गाडे, नितीन विचारे यांनी टॉप गिअर टाकत सामना आपल्या बाजूने झुकविला. नूतन सोनारसिद्धच्या भारत मालुसरे, अनिकेत ठमके यांना उत्तरार्धात लय सापडली नाही.

   अ गटात उपनगरच्या जॉली स्पोर्टसने ठाण्याच्या स्व.आकाश क्रीडा मंडळावर ४३- १९अशी सहज मात केली. पूर्वार्धातच जॉलीने २ लोण चढवीत २४-०८अशी आघाडी घेत विजयाचा पाया रचला. उत्तरार्धात आणखी एक लोण देत त्यावर कळस चढविला. अभिषेक नर, नामदेव इस्वलकर यांचा झंजावात रोखणे आकाशच्या खेळाडूंना शक्य झाले नाही. आकाशच्या राकेश पाटीलचा प्रतिकार आज दुबळा ठरला. ड गटात उपनगरच्या स्वस्तिक मंडळाने ठाण्याच्या श्री हनुमान मंडळावर ४२-२३असा विजय मिळविला. पहिल्या डावात १लोण देत १८-०६अशी आघाडी घेणाऱ्या स्वस्तिकने दुसऱ्या डावात आणखी २लोण देत हा विजय सोपा केला. दुसऱ्या डावात एका लोणची परतफेड हनुमान संघ करू शकला.  आक्रम शेख, अभिषेक चव्हाण, ऋषी कांबळी या विजयाचे शिल्पकार ठरले. सुरज बुधाने, तेजस निकम यांनी हनुमानकडून उत्तम लढत दिली. इ गटात मुंबई शहरच्या विजय नवनाथने उपनगरच्या केदारनाथ क्रीडा मंडळाला ३३-२० असे पराभूत केले. पूर्वार्धातच २लोण देत विजय नवनाथने २१-१० अशी विजयाच्या दृष्टीने आघाडी घेतली. उत्तरार्धात सावध खेळ करीत विजय साकारला. हर्ष लाड, मयूर खामकर यांच्या चढाई-पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते. उत्तरार्धात केदारनाथच्या चेतन कदम, ओमकार कदम यांनी आपला खेळ गतिमान करीत भराभर गुण घेण्याचा सपाटा लावला. पण पराभवातील अंतर कमी करण्याव्यतिरिक्त त्यांना अधिक काय करता आले नाही. 

Web Title: State Level Kabaddi: Vijay Club, Jolly Sports, Amar krida mandal won 1st round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.