ही ‘क्लीन क्रिकेट’ची सुरुवात!
By Admin | Updated: January 23, 2015 01:13 IST2015-01-23T01:13:29+5:302015-01-23T01:13:29+5:30
भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निकाल गुरुवारी जाहीर झाला.

ही ‘क्लीन क्रिकेट’ची सुरुवात!
सर्वाेच्च न्यायालय : क्रिकेट प्रशासकांचे कान टोचणारा ऐतिहासिक निकाल...
किशोर बागडे - नागपूर
भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणारा ऐतिहासिक निकाल गुरुवारी जाहीर झाला. बीसीसीआयची दुकानदारी असलेल्या आयपीएलसारख्या (इंडियन पैसा लीग) मसाला क्रिकेटमध्ये झालेले फिक्सिंग आणि बेटिंग दुसरे कुणी नव्हे, तर प्रशासकांचे नातेवाईक किंवा संघमालकच करतात, हेदेखील निष्पन्न झाले. बीसीसीआय ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असल्याच्या तोऱ्यात वागणाऱ्यांना यामुळे जो ‘चाप’ बसला तो पाहता, ही तर ‘क्लीन क्रिकेट’ची सुरुवात आहे, असेच म्हणावे लागेल.
खेळात ‘बेटिंग’ आणि ‘फिक्सिंग’ पूर्वापार चालत आले पण बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांनी अलिकडे जो उन्माद केला त्यामुळे खेळाला कीड लागते की काय, अशी सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांना भीती वाटत होती. सुप्रीम कोर्टाच्या निकालाने चेन्नई सुपरकिंग्सचा सीईओ गुरुनाथ मय्यप्पन, राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा यांच्यासारखे ‘कुजके आंबे’ बाहेर पडल्याने क्रिकेटमधील घाण नाहीशी होण्यास मदत होणार आहे. इंडिया सिमेंटचे मालक आणि चेन्नई सुपरकिंग्सचे सर्वेसर्वा एन. श्रीनिवासन हेच बीसीसीआयचे प्रमुखही होते.
सर्वत्र आपणच असल्याने काहीही केले तरी खपून जाते या अविर्भावात ते वागायचे. तासन्तास क्रिकेट पाहणाऱ्यांचा विश्वासाला तडा देणारे असभ्य प्रकार आणि फिक्सिंगसारख्या घटना पुढे आल्याने सर्वसामान्यांच्या विश्वासाला तडा गेला. क्रिकेटचे संचालन करणाऱ्या बीसीसीआयमध्ये राजकारण्यांचा शिरकाव झाल्यानंतर खेळाचे अर्थतंत्रही विस्तारले. अमाप प्रसिद्धी असलेल्या या खेळात बेशिस्त खपवून घ्यायला ‘स्कोप’ येऊ लागला. आयपीएल सुरू झाल्यामुळे जितका अधिक पैसा आला तितकेच भारतीय क्रिकेटचे नुकसानही झाले.
आयपीएलच्या निमित्ताने फिक्सिंग आणि बेटिंगप्रकरणी त्यांच्या जावयाचे नाव पुढे आले तेव्हा श्रीनिवासन यांनी आधी ‘जावई माझा भला’ असे ओरडून सांगितले. नंतर फिक्सिंग वैगरे बकवास प्रकार असल्याची सारवासारव त्यांनी केली. पण अखेर ‘तो मी नव्हेच’ असा आव आणणाऱ्या श्रीनिवासन यांच्या नाटकाचा अखेरचा अंक संपला. कोर्टाने फिक्सिंगमध्ये श्रीनिंचा प्रत्यक्ष सहभाग नाही हे जरी स्पष्ट केले असले तरी बीसीसीआयचे प्रमुख म्हणून सर्व गैरप्रकाराला आळा घालण्यास आपण असमर्थ ठरलात.
आयपीएलमध्ये येईल शिस्त!
आयपीएलमध्ये यापुढे शिस्त येणार आहे. पदाधिकाऱ्यांचा समावेश असलेले संघ ठेवण्यास न्यायालयाने चपराक दिली आहे. त्यामुळे फ्रॅन्चायसी कोण, त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय, त्यांच्या मागे उभी असलेली यंत्रणा या सर्वांची अद्ययावत माहिती बीसीसीआयला ठेवावी लागेल. बीसीसीआयच्या कामकाजावर स्वत: तीन सदस्यांची समिती लक्ष ठेवणार असल्याने आता ताकही ‘फुंकून फुंकून प्यावे’ हे धोरण अवलंबण्याशिवाय बीसीसीआयला पर्याय नाही. ‘हम करे सो कायदा’ हे यापुढे चालणार नाही. निर्णय आणि महत्त्वपूर्ण वाटचालींची माहिती सार्वजनिक करण्याचे बंधन न्यायालयाने घातल्यामुळे पदाचा दुरुपयोग करणाऱ्यांना पळता भुई थोडी होणार आहे.
धोकाही तितकाच!
राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज या संघांची आयपीएलमधून हकालपट्टी झाली असल्याने हे दोन्ही संघ यापुढे दिसणार नाहीत. पण, यामागे उभ्या असलेल्या आर्थिक शक्ती अन्य दुसऱ्या नावाने संघ विकत घेण्याची शक्यताही नाकारता येणार नाही.
नवी तडजोड करीत मागच्या दाराने क्रिकेटच्या धंद्यात शिरकाव करण्याची ज्यांना सवय आहे, अशांना रोखण्याचे कसब बीसीसीआयच्या कार्यकारिणीला दाखवावे लागणार आहे. श्रीनिवासन यांच्यासारखे दुहेरी हितसंबंध जोपासणाऱ्यांना थारा दिला जाऊ नये.
क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ आहे तो असभ्य लोकांच्या हातात जाऊ नये, याची काळजी बीसीसीआयला घ्यायची आहे.
न्यायालयाचे दिशानिर्देश आयपीएलचा चेहरामोहरा बदलविणारे ठरणारच आहेत. पण यामुळे क्रिकेट प्रशासन स्वच्छ तसेच पारदर्शी व्हावे, हीच क्रिकेटशौकिनांची इच्छा राहील.