श्रीलंका भारताला कडवे आव्हान देईल
By Admin | Updated: August 4, 2015 22:54 IST2015-08-04T22:54:46+5:302015-08-04T22:54:46+5:30
श्रीलंका संघ मायदेशातील वातावरणात भारतापुढे कडवे आव्हान निर्माण करेल आणि पाहुण्या संघाला विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल,

श्रीलंका भारताला कडवे आव्हान देईल
कोची : श्रीलंका संघ मायदेशातील वातावरणात भारतापुढे कडवे आव्हान निर्माण करेल आणि पाहुण्या संघाला विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा माजी कर्णधार व आक्रमक फलंदाज सनथ जयसूर्याने व्यक्त केली.
श्रीलंकेला अलीकडे पाकिस्तानविरुद्ध कसोटी, टी-२० आणि वन-डे सामन्यांच्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला. आता भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध १२ आॅगस्टपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जयसूर्या म्हणाला, ‘‘पाकिस्तानविरुद्ध आम्हाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही, हे निराशाजनक आहे. श्रीलंका संघ सध्या अडचणीच्या स्थितीत आहे, पण मायदेशात हा संघ चांगली कामगिरी करेल आणि भारतापुढे आव्हान निर्माण करेल, असा मला विश्वास आहे.’’
कोचीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेला जयसूर्या म्हणाला, ‘‘श्रीलंका संघाला सध्या अनुभवी खेळाडूंची उणीव भासत आहे, पण संघातील उर्वरित खेळाडू शानदार कामगिरी करतील, अशी आशा आहे. श्रीलंका क्रिकेटसाठी भारताविरुद्धची मालिका महत्त्वाची असून यजमान संघ या मालिकेत चमकदार कामगिरी करेल, असा विश्वास आहे.’’
जयसूर्या म्हणाला, ‘‘भारतीय संघ सध्या शानदार कामगिरी करीत आहे. त्यामुळे या मालिकेत श्रीलंका संघापुढे कडवे आव्हान राहील, यात शंकाच नाही, पण श्रीलंका संघाला मायदेशात खेळण्याचा लाभ मिळेल.’’
श्रीलंका संघात जेहान मुबारकच्या पुनरागमनाबाबत बोलताना जयसूर्या म्हणाला, ‘‘श्रीलंकेत प्रतिभावान युवा खेळाडू नाहीत, असे तुमचे मत असेल, पण ते चुकीचे आहे. आमच्याकडे चांगले युवा खेळाडू आहेत, पण परिस्थितीनुरूप आम्हाला फलंदाजीमध्ये अनुभवाच्या आधारावर खेळाडूंची निवड करावी लागते. जेहान मुबारकच्या पुनरागमनाचा संघाला नक्कीच लाभ मिळेल.’’ (वृत्तसंस्था)