श्रीलंकेने उडवला इंग्लंडचा धुव्वा
By Admin | Updated: March 1, 2015 12:07 IST2015-03-01T11:55:02+5:302015-03-01T12:07:39+5:30
लाहिरु थिरीमाने आणि कुमार संगकाराच्या द्विशतकी भागीदारीने श्रीलंकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला. इंग्लंडने दिलेले ३०९ धावांचे लक्ष्य लंकेने ४७.२ षटकांत गाठून इंग्लंडवर नऊ विकेट्सनी मात केली.

श्रीलंकेने उडवला इंग्लंडचा धुव्वा
ऑनलाइन लोकमत
वेलिंग्टन, दि. १ - श्रीलंकेचा सलामीवीर लाहिरु थिरीमाने आणि कुमार संगकाराच्या द्विशतकी भागीदारीने लंकेने इंग्लंडचा धुव्वा उडवला. इंग्लंडने दिलेले ३०९ धावांचे लक्ष्य लंकेने ४७.२ षटकांत गाठून इंग्लंडवर नऊ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला.
वर्ल्डकपमध्ये रविवारी श्रीलंका विरुद्ध इंग्लंड हे संघ आमने सामने होते. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडची अवस्था ४ बाद १६१ धावा अशी होती. मात्र त्यानंतर जो रुटने जेम्स टेलरसोबत ९८ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. जो रुटने झंझावाती १२१ धावांची खेळी केली. तर जॉस बटलरच्या नाबाद ३९ धावांची खेळी केल्याने इंग्लंडने ५० षटकांत ६ गडी गमावत ३०९ धावा केल्या.
फलंदाजीसाठी उतरलेल्या श्रीलंकेचा सुरुवात चांगली झाली. तिलकरत्ने दिलशान (४४धावा) व लाहिरु थिरीमानेने शतकी सलामी दिली. दिलशान बाद झाल्यावर थिरीमाने (नाबाद १३९ धावा) व कुमार संगकारा (नाबाद ११७ धावा) या जोडीने श्रीलंकेला दिमाखदार विजय मिळवून दिला. दोन्ही संघाचे क्षेत्ररक्षण ढिसाळ होते. मात्र शेवटी श्रीलंकेच्या फलंदाजांच्या फटकेबाजीने इंग्लंडला पराभवाला सामोरे जावे लागले. वन डे सामन्यात एका विकेटच्या मोबदल्यात ३०० हून धावांचे लक्ष्य गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी भारताने २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात हा कारनामा केला होता.