एसआरएचची दावेदारी भक्कम

By Admin | Updated: May 16, 2016 04:18 IST2016-05-16T04:18:49+5:302016-05-16T04:18:49+5:30

युवराज सिंगच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) रंगतदार लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचा ७ गडी राखून पराभव केला

SRH's claim is strong | एसआरएचची दावेदारी भक्कम

एसआरएचची दावेदारी भक्कम

मोहाली : कर्णधार डेव्हिड वॉर्नरच्या (५२) अर्धशतकी खेळीनंतर सिक्सर किंग युवराज सिंगच्या नाबाद ४२ धावांच्या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने (एसआरएच) रंगतदार लढतीत किंग्स इलेव्हन पंजाबचा ७ गडी राखून पराभव केला आणि आयपीएलच्या नवव्या पर्वात प्ले आॅफचा दावा मजबूत केला.
पंजाबने हाशिम अमलाच्या (९६) अर्धशतकी खेळीच्या जोरावर ४ बाद १७९ धावांची आव्हानात्मक मजल मारली होती, पण युवराजने आक्रमक खेळी करीत हैदराबाद संघाला १९.४ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. युवराजने २४ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ४२ धावांची खेळी केली. त्यात ३ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे. बेन कटिंगने ११ चेंडूंमध्ये नाबाद २१ धावा फटकावल्या. युवराजने कटिंगसोबत केवळ ३.४ षटकांत चौथ्या विकेटसाठी ४४ धावांची अभेद्य भागीदारी करीत संघाला विजय मिळवून दिला.
या विजयासह सनराझर्सने १२ सामन्यांत ८ विजयांसह १६ गुणांची कमाई केली. सनरायझर्स संघ अव्वल स्थानावर असून, त्यांचे प्ले आॅफमध्ये खेळणे जवळजवळ निश्चित झाले अहे. पंजाब संघाच्या खात्यावर
१२ सामन्यांत केवळ ८ गुणांची नोंद असून, रायझिंग पुणे सुपरजायन्ट््स संघानंतर प्ले आॅफच्या शर्यतीतून बाहेर पडलेला हा दुसरा संघ ठरला आहे.
त्याआधी, स्टार फलंदाज हाशिम अमलाचे शतक केवळ चार धावांनी हुकले, पण त्याच्या ९६ धावांच्या खेळीच्या जोरावर किंग्स इलेव्हनने ४ बाद १७९ धावांची दमदार मजल मारली. आयपीएलच्या आपल्या पहिल्याच मोसमात खेळत असलेल्या अमलाने ५६ चेंडूंना सामोरे जाताना १४ चौकार व २ षटकाराच्या मदतीने ९६ धावा फटकावल्या. त्याने गुरकिरत सिंगसोबत (२७) तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची, तर रिद्धिमान साहासोबत (२७) दुसऱ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. डेव्हिड मिलर (२० धावा, ९ धावा) नाबाद राहिला. पंजाब संघाने अखेरच्या ७ षटकांत ७७ धावा फटकावल्या. हैदराबादतर्फे भुवनेश्वर कुमारने ३२ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. मुस्तफिजुर रहमान व मोइजेस हेन्रिक्सने प्रत्येकी एक बळी घेतला. आशिष नेहरा महागडा गोलंदाज ठरला. दुखापतग्रस्त होण्यापूर्वी त्याने २.५ षटकांत ३५ धावा बहाल केल्या. (वृत्तसंस्था)
।संक्षिप्त धावफलक
किंग्स इलेव्हन पंजाब : हाशिम अमला झे. वॉर्नर गो. भुवनेश्वर ९६, मुरली विजय झे. वॉर्नर गो. मुस्तफिजूर ०६, रिद्धिमान साहा झे. हुड्डा गो. हेनरिक्स २७, गुरकिरत सिंग त्रि. गो. भुवनेश्वर २७, डेव्हिड मिलर नाबाद २०, एकूण २० षटकांत ४ बाद १७९. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३२-२, मुस्तफिजूर ४-०-३२-१, हेनरिक्स ३-०-२९-१
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर हिटविकेट गो. अक्षर ५२, शिखर धवन धावबाद २५, दीपक हुड्डा झे. मिलर गो. संदीप ३४, युवराज सिंग नाबाद ४२, बेन कटिंग नाबाद २१. एकूण १९.४ षटकांत ३ बाद १८३. गोलंदाजी : संदीप ४-०-३५-१, अक्षर ४-०-२६-१.

Web Title: SRH's claim is strong

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.