फलंदाजांची ‘फिरकी’

By Admin | Updated: November 6, 2015 02:42 IST2015-11-06T02:42:36+5:302015-11-06T02:42:36+5:30

फिरकीला पूरक असलेली पंजाब क्रिकेट संघटनेची खेळपट्टी पहिल्याच दिवशी लौकिकास जागली. या खेळपट्टीने दोन्ही संघांच्या फलंदाजांची ‘फिरकी’ घेतल्याने पहिल्या कसोटीत भारताला

'Spin' of batsmen | फलंदाजांची ‘फिरकी’

फलंदाजांची ‘फिरकी’

मोहाली : फिरकीला पूरक असलेली पंजाब क्रिकेट संघटनेची खेळपट्टी पहिल्याच दिवशी लौकिकास जागली. या खेळपट्टीने दोन्ही संघांच्या फलंदाजांची ‘फिरकी’ घेतल्याने पहिल्या कसोटीत भारताला पहिल्या डावात केवळ २०१ धावांपर्यंतच मजल गाठता आली. द. आफ्रिकेची सुरुवातही तितकीच डळमळीत झाली. आघाडीचे दोन फलंदाज त्यांनी अवघ्या २८ धावांत गमविले.
खेळपट्टीने पहिल्याच दिवशी ‘टर्न’ घेणे सुरू केल्यामुळे भारतीय संघ ६८ षटकांत गारद झाला. डीन एल्गरने चार आणि इम्रान ताहिरने दोन गडी बाद केले. टी-२० आणि वन डे मालिका गमविल्यानंतर कसोटी मालिकेत विजयाच्या आशेने उतरलेल्या भारतीय संघाला मोठी झेप घेणे जमलेच नाही. पहिल्या दोन सत्रातील पाहुण्या गोलंदाजांच्या वर्चस्वानंतरही अपवाद राहिला तो मुरली विजयचा. त्याने सर्वाधिक ७५ धावांचे योगदान दिले. कर्णधार विराट कोहली याने नाणेफेकीचा कौल बाजूने येताच फलंदाजी घेतली खरी; पण एल्गरने भारताच्या आशा धुळीस मिळविल्या. प्रत्युत्तरात आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. त्यांचे आघाडीचे दोन फलंदाज आश्विन आणि जडेजाने फिरकीच्या जाळ्यात ओढले. दुसऱ्या बाजूने उमेश यादवदेखील प्रभावी ठरला. सातव्या षटकात सलामीचा स्टियान वान झील (५)आश्विनच्या चेंडूवर पायचित झाला. जडेजाने फाफ डुप्लेसिसला भोपळा फोडण्याआधीच दांडी गूल करीत तंबूची वाट दाखविली. खेळ थांबला तेव्हा डीन एल्गर १३ आणि कर्णधार हाशिम अमला ९ हे नाबाद होते. अव्वल क्रमांकावर असलेल्या या संघाने २० षटकांत केलेल्या २८ धावांमुळे खेळपट्टी फलंदाजांसाठी किती ‘कर्दनकाळ’ ठरली याची कल्पना येते.
सकाळी भारताने धवनला गमविले तेव्हा फळ्यावर एकच धाव होती. विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी ६३ धावांची भागीदारी केली. दुसऱ्या टोकाहून डेल स्टेनने टिच्चून मारा केल्याने फलंदाजांना खेळण्यास अडचण येत होती. नंतर चार चेंडूत दोन गडी बाद झाले. एल्गरने पुजाराला पायचित केले तर २७ वा वाढदिवस साजरा करणारा कोहली कासिगो रबाडाच्या चेंडूवर कव्हरमध्ये एल्गरकडे झेल देत एका धावेवर बाद झाला. विजय आणि रहाणे यांनी उपहारापर्यंत पडझड थोपवित ३ बाद ८२ पर्यंत डाव खेचला. एल्गर येताच पुन्हा पतन सुरू झाले. ३८ ते ४० व्या षटकांत भारताने आणखी दोन गडी गमविले. रहाणेने पहिल्या स्लिपमध्ये झेल दिला. एल्गरने पुढच्याच षटकात रिद्धिमान साहा याला बाद केले. जडेजाने (३८) मात्र त्याची हॅट्ट्रिक पूर्ण होऊ दिली नाही. दरम्यान विजयने १२ वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याने रहाणेसोबत ३७ आणि जडेजासोबत ३८ धावांची भागीदारी केली. आॅफस्पिनर हार्मरने त्याला पायचित केले. अमित मिश्रा (६) एल्गरचा बळी ठरला. उमेश यादव (५) आणि वरुण अ‍ॅरोन (०) हे ताहिरचे बळी ठरले. आश्विन २० धावांवर नाबाद राहिला. (वृत्तसंस्था)

टीम इंडियाची धावसंख्या मोठी ठरेल : बांगर
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक
जिंकून पहिल्या डावात २०१ धावांची मजल मारली. तरी एकूणच खेळपट्टीवर फिरकीपटूंना मिळणारी मदत बघता टीम इंडियाची धावसंख्या खूप मोठी ठरेल, असे भारतीय संघाच्या फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले.
बांगर यांनी सांगितले की, भारताला आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी रोखले; परंतु आफ्रिकेलाही झटपट दोन धक्के देऊन भारतीय फिरकीपटूंनी संघाला पुनरागमन करून दिले. त्यामुळेच या सामन्यात आता दोन्ही संघाकडे समान संधी आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा फायदा घेण्यात भारत अपयशी ठरला का, यावर बांगर म्हणाले की, काही प्रमाणात अपयशी ठरला; परंतु ही कसर फिरकीपटूंनी भरून काढत प्रतिस्पर्ध्यांचे २ बळी झटपट मिळवले. २० षटकांनंतरही केवळ २ बाद २८ धावा होतात, यावरून कळतं की २०१ धावसंख्या नक्कीच मोठी ठरू शकते. त्याचप्रमाणे ही खेळपट्टी वाईट नसून आव्हानात्मक आहे. या खेळपट्टीवर धावा करणे कठीण असेल, असेही बांगर यांनी सांगितले.
बांगर यांनी पुढे सांगितले की, ज्या सामन्यात फलंदाज व गोलंदाज दोघांनाही समान संधी मिळते, तेव्हा ती खरी ‘लढत’ असते. माझ्या मते गोलंदाजांना अधिक संधी मिळाव्यात. या खेळपट्टीवर गोलंदाजांची बाजू वरचढ असून, त्यानुसार ताळमेळ साधत फलंदाजांना खेळावे लागेल.

प्रेक्षकांनी कोहलीसाठी गायले वाढदिवसाचे गीत; पण त्याने केले निराश
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्याच्या सुरुवातीच्या दिवशीच फलंदाजीत फ्लॉप(१ धाव) ठरला; परंतु त्यानंतरही प्रेक्षकांनी या स्टार खेळाडूसाठी वाढदिवसाचे गीत गायले. कोहली आज २७ वर्षांचा झाला.चेतेश्वर पुजारा बाद झाल्यानंतर, खेळपट्टीवर कोहलीने पाऊल ठेवताच आयएस बिंद्रा स्टेडियमवरील उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांनी त्याचे स्वागत केले. तसेच, प्रेक्षकांनी ‘हॅप्पी बर्थडे डियर कोहली’ हे गीतदेखील गायले.
स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर देशभरातील चाहत्यांच्या कोहलीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा दाखवल्या जात होत्या. एक चाहता अंश बन्सलने त्याच्या संदेशात लिहिले, ‘भारताचा हिरा विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा’. त्याआधी भारतीय संघाने टिष्ट्वटरवर आपल्या शुभेच्छा दिल्या. दिवस जसजसा पुढे जात होता, तशी शुभेच्छा देणाऱ्यांची संख्याही वाढत गेली.

धावफलक
भारत पहिला डाव : मुरली विजय पायचित गो. हार्मर ७५, शिखर धवन झे. अमला गो. फिलॅन्डर ००, चेतेश्वर पुजारा पायचित गो. एल्गर ३१, विराट कोहली झे. एल्गर गो. रबाडा १, अजिंक्य रहाणे झे. अमला गो. एल्गर १५, रिद्धिमान साहा झे. अमला गो. एल्गर ००, रवींद्र जडेजा पायचित गो. फिलॅन्डर ३८, अमित मिश्रा झे. स्टेन गो. एल्गर ६, रविचंद्रन आश्विन नाबाद २०, उमेश यादव त्रि. गो. ताहिर ५, वरुण अ‍ॅरोन त्रि. गो. ताहिर ००, अवांतर : १०, एकूण : ६८ षटकांत सर्वबाद २०१ धावा. गडी बाद क्रम : १/०, २/६३, ३/६५, ४/१०२, ५/१०२, ६/१४०, ७/१५४, ८/१९६, ९/२०१, १०/२०१. गोलंदाजी : स्टेन ११-३-३०-०, फिलॅन्डर १५-५-३८-२, हार्मर १४-१-५१-१, रबाडा १०-०-३०-१, एल्गर ८-१-२२-४, ताहिर १०-३-२३-२.

दक्षिण आफ्रिका : डीन एल्गर नाबाद १३, स्टियान वान झील पायचित गो. आश्विन ५, फाफ डुप्लेसिस त्रि. गो. जडेजा ०, हाशिम अमला नाबाद ९. अवांतर १, एकूण : २० षटकांत २ बाद २८ धावा. गडी बाद क्रम : १/९, २/९. गोलंदाजी : आश्विन ७-३-४-१, यादव ३-१-५-०, अ‍ॅरोन ३-१-४-०, जडेजा ५-०-७-१,
मिश्रा २-०-७-०.

Web Title: 'Spin' of batsmen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.