सलग दोन मालिका विजय विराटसाठी स्पेशल
By Admin | Updated: November 27, 2015 23:54 IST2015-11-27T23:54:07+5:302015-11-27T23:54:07+5:30
एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते.

सलग दोन मालिका विजय विराटसाठी स्पेशल
एका युवा कर्णधारासाठी सलग दोन मालिकांमध्ये विजय मिळवणे स्पेशल बाब ठरते. विराट मायदेशात खेळत असल्यामुळे त्याच्यावर अधिक दडपण होते. दक्षिण आफ्रिका अव्वल स्थानावरील संघ असल्यामुळे विराटसाठी हा मालिका विजय मोठी उपलब्धी आहे. मला विशेषत: कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय खेळाडूंच्या मानसिकतेमध्ये बदल दिसत आहे. कर्णधार म्हणून विराट अॅक्टिव्ह आहे. तो प्रत्येक चेंडूनंतर खेळाडूंसोबत चर्चा करतो. कारण तो धोनीप्रमाणे यष्टिरक्षण करीत नाही. तो गोलंदाजांसोबत चर्चा करतो. त्यामुळे गोलंदाजांना कामगिरी सुधारण्यास मदत मिळते.
दुसऱ्या बाजूचा विचार करता दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हाशिम अमलाला अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कधी-कधी दोन स्वरूपासाठी वेग-वेगळे कर्णधार असणे चांगली बाब ठरते, पण कधी-कधी अडचणीचेही ठरते. कारण त्यामुळे दुसरा कर्णधार थोडा रिलॅक्स होतो. तसे वेगवेगळ्या शैलीच्या कर्णधारांना परिस्थितीसोबत जुळवून घेण्यास वेळ लागतो. या खेळपट्टीवर कर्णधार म्हणून एबी डिव्हिलियर्सलाही संघर्ष करावा लागला असते, असे मी यापूर्वीही म्हटले आहे. हाशिमने चांगली भूमिका बजावली. निकालाच्या आधारावर त्याच्या कामगिरीचे आकलन करणे योग्य ठरणार नाही. आमला ही भूमिका बजावू शकतो किंवा नाही, याचा निर्णय पुढील सहा महिन्यांमध्ये होईलच. मी कधीच दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळलेलो नाही, पण अनेक कर्णधारांच्या नेतृत्वाखाली नक्कीच खेळलो.
गेल्या तीन वर्षांत दक्षिण आफ्रिका कसोटी संघात अनेक बदल झालेले आहेत. कर्णधार ग्रॅमी स्मिथ, अष्टपैलू जॅक कॅलिस, शानदार यष्टिरक्षक मार्क बाऊचर आता संघात नाहीत. अशा खेळाडूंची उणीव भरून काढण्यासाठी कधी-कधी एका दशकाचाही वेळ लागू शकतो. या व्यतिरिक्त डेल स्टेनही संघात नाही. त्याची रिव्हर्स स्विंग गोलंदाजी या खेळपट्टीवर भेदक ठरली असती. मी खेळपट्टीबाबत काही बोलू इच्छित नाही. येथे खेळणे निश्चितच कठीण होते, पण द. आफ्रिका संघाने फिरकीविरुद्ध लौकिकाला साजेशी फलंदाजी केली नाही.
भारताला विजयाचे श्रेय द्यायलाच हवे. भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला होता. अश्विनने सामन्यात १२ बळी घेतले. त्याचा मारा खेळणे अडचणीचे ठरत आहे. तो जगातील सर्वोत्मत आॅफ स्पिनर ठरत आहे. कामगिरीत सातत्य राखणारा अश्विन आक्रमकही आहे. जडेजाही चांगली गोलंदाजी करीत आहे. खेळपट्टी त्याच्यासाठी अनुकूल आहे. पहिल्या डावात ७९ धावांत गारद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिका संघासाठी सामन्यात परतणे कठीण होते. (टीसीएम)