द. आफ्रिका २४८ धावांत गारद
By Admin | Updated: July 21, 2015 23:40 IST2015-07-21T23:40:17+5:302015-07-21T23:40:17+5:30
गेल्या महिन्यात पहिल्या वन-डे लढतीत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने पदार्पणाच्या कसोटी

द. आफ्रिका २४८ धावांत गारद
चटगाव : गेल्या महिन्यात पहिल्या वन-डे लढतीत भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवणारा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने पदार्पणाच्या कसोटी सामन्यात आज चार चेंडूंच्या अंतरात तीन बळी घेण्याची कामगिरी केली. मुस्तफिजुरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर बांगलादेशने आजपासून प्रारंभ झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २४८ धावांत गुंडाळला. प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेशने दिवसअखेर दोन षटकांच्या खेळात बिनबाद ७ धावा केल्या. आजचा खेळ थांबला त्या वेळी तमीम इक्बाल (१) आणि इमरुल कायेस (५) खेळपट्टीवर होते.
मुस्तफिजुरने ३७ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याने कर्णधार हाशिम अमला (१३), जेपी ड्युमिनी व क्विंटन डिकाक यांना चार चेंडूंच्या अंतरात माघारी परतवत दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला धक्का दिला. लेग स्पिनर जुबेर हुसेनने ५३ धावांत ३ बळी घेत त्याला योग्य साथ दिली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाला चांगल्या व आक्रमक सुरुवातीचा लाभ घेता आला नाही. त्यांनी अखेरच्या ९ विकेट केवळ ११२ धावांच्या मोबदल्यात गमावल्या. कारकिर्दीतील तिसरा कसोटी सामना खेळणाऱ्या तेम्बा बावुमाने दक्षिण आफ्रिकेतर्फे सर्वाधिक ५४ धावा केल्या. डीन एल्गर (४७) व स्टियान वान जिल (३४) यांनी सलामीला ५८ धावांची भागीदारी करीत दक्षिण आफ्रिकेला चांगली सुरुवात करून दिली. एल्गरने त्यानंतर फॅफ ड्युप्लेसिसच्या (४८) साथीने दुसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. उपाहाराला खेळ थांबला त्या वेळी दक्षिण आफ्रिकेने १ बाद १०४ अशी मजल मारली होती.
धावफलक
दक्षिण आफ्रिका पहिला डाव : डीन एल्गर झे. दास गो. इस्लाम ४७, वान झिल झे. दास गो. महमुदुल्ला ३४, फॅफ ड्यूप्लेसिस पायचीत गो. शाकिब ४८, हाशिम अमला झे. दास गो. रहमान १३, टेम्बा बावुमा झे. हुसेन गो. रहमान ५४, जीन पॉल ड्युमिनी पायचीत गो. रहमान ००, क्विंटन डिकाक त्रि. गो. रहमान ००, वेर्नोन फिलँडर झे. शाकिब गो. हुसेन २४, सिमोन हार्मेर झे. मोमिनुल गो. हुसेन ०९, डेल स्टेन झे. तमीम गो. हुसेन ०२. अवांतर (१४). एकूण ८३.४ षटकांत सर्व बाद २४८. बाद क्रम : १-५८, २-१३६, ३-१३६, ४-१७३, ५-१७३, ६-१७३, ७-२०८, ८-२३७, ९-२३९, १०-२४८. गोलंदाजी : मोहम्मद शाहिद १७-९-३४-०, मुस्तफिजुर रहमान १७.४-६-३७-४, शाकिब अल-हसन १४-२-४५-१, महमुदुल्ला ३-०-९-१, ताजिउल इस्लाम १८-३-५७-१, जुबेर हुसेन १४-१-५३-३.
बांगलादेश पहिला डाव :- तमीम इक्बाल खेळत आहे ०१, इमरुल कायेस खेळत आहे ०५. अवांतर (१), एकूण २ षटकांत बिनबाद ७. गोलंदाजी : डेल स्टेन १-०-६-०, वेर्नोन फिलँडर १-०-१-०.