दक्षिण आफ्रिकेला मोठ्या विजयाची अपेक्षा
By Admin | Updated: March 12, 2015 00:29 IST2015-03-12T00:29:44+5:302015-03-12T00:29:44+5:30
विश्वचषकात आतापर्यंत चढ-उताराचा सामना करणाऱ्या द. आफ्रिकेला उद्या गुरुवारी ‘ब’ गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात तुलनेत

दक्षिण आफ्रिकेला मोठ्या विजयाची अपेक्षा
वेलिंग्टन : विश्वचषकात आतापर्यंत चढ-उताराचा सामना करणाऱ्या द. आफ्रिकेला उद्या गुरुवारी ‘ब’ गटाच्या अखेरच्या साखळी सामन्यात तुलनेत दुबळ्या संयुक्त अरब अमिरातविरुद्ध (यूएई) मोठ्या विजयाची अपेक्षा राहील.
मागच्या सामन्यात पाकिस्तानकडून पराभूत झालेल्या डिव्हिलियर्सच्या नेतृत्वाखालील या संघाला आतापर्यंत संमिश्र यश मिळाले आहे. ‘ब’ गटात हा संघ भारतानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. डिव्हिलियर्स मात्र आपल्या संघाला कमी लेखण्यास तयार नाही. भारत आणि पाककडून पराभूत झाल्यानंतरही आम्ही सर्वश्रेष्ठ असल्याचा त्याचा दावा आहे. तो म्हणतो, ‘माझ्यामते आमचा संघ अद्याप सर्वोत्कृष्ट आहे. साखळीत मिळालेल्या या दोन पराभवामुळे आम्हाला दु:ख झाले; पण अद्यापही आम्हीच बलाढ्य आहोत. विश्वचषक जिंकण्यासाठी आता काहीच सामने जिंकायचे आहेत.’
एखादा बलाढ्य संघ कमकुवत संघाविरुद्ध खेळणार असेल, तर बेंच स्ट्रेंथचा संधी देण्याचा प्रयत्न करतो; पण डिव्हिलियर्स तसे करू
इच्छित नाही. तो कुठलाही बदल करण्याच्या स्थितीत नाही. याबाबत तो म्हणतो, ‘सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंमध्ये फारसे बदल करणे परवडण्यासारखे नाही. ‘ब’ गटात दुसरे स्थान कायम ठेवायचे झाल्यास यूएईला हरवावेच लागेल. त्यामुळे क्वार्टरफायनल श्रीलंकेविरुद्ध खेळण्याची संधी राहील.’
विश्वचषकात दुसऱ्यांदा खेळणाऱ्या यूएईने आतापर्यंत सर्व चारही सामने गमावले; पण या संघाचा कर्णधार मोहंमद तौकिर हा द. आफ्रिकेचा पाककडून झालेल्या २९ धावांच्या पराभवातून प्रेरणा
घेण्याचा प्रयत्न करणार आहे. तो म्हणाला,‘द. आफ्रिका पाककडून पराभूत होईल, अशी आशा नव्हती; पण खेळात काहीही घडू शकते हे निकालावरून स्पष्ट झाले.
आमची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चांगले आहे. सुरुवातीला काही बळी घेऊ शकलो, तर आफ्रिकेला दबावात आणू शकतो. द. आफ्रिका आमच्याविरुद्ध ४०० धावा काढेल, असे वाटत नाही. ’
द. आफ्रिकेने आयर्लंड आणि विंडीजविरुद्ध ४०० वर धावा ठोकल्या. यूएई संघ गटात सर्वांत तळाच्या स्थानाला आहे. स्वत:चा दम दाखवित असोसिएट संघांची बाजू सावरण्याचा त्यांना प्रयत्न करावा लागेल; अन्यथा पुढच्या विश्वचषकात खेळायला मिळणार नाही. तौकिरने २०१९ च्या विश्वचषकात १० ऐवजी १४ संघ असावेत, अशी आयसीसीला विनंती केली आहे. तो पुढे म्हणाला, ‘आमच्या क्रिकेटसाठी ही चांगली बातमी नाही. विश्वचषकात खेळणे हे आमचे मुख्य लक्ष्य असते.’(वृत्तसंस्था)