आयपीएलमुळे ‘स्लेजिंग’ कमी

By Admin | Updated: November 3, 2015 04:00 IST2015-11-03T04:00:32+5:302015-11-03T04:00:32+5:30

सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्ती कायम राखण्यावर जोर देताना भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमुळे जगातील

'Sledding' due to IPL | आयपीएलमुळे ‘स्लेजिंग’ कमी

आयपीएलमुळे ‘स्लेजिंग’ कमी

नवी दिल्ली : सभ्य लोकांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्ती कायम राखण्यावर जोर देताना भारताचा मर्यादित षटकांच्या सामन्यांतील कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमुळे जगातील क्रिकेटपटू एकत्र येण्यास मदत झाली आणि क्रिकेटमधून ‘स्लेजिंग’ला दूर सारण्यास मदत मिळाली, असे मत व्यक्त केले आहे.
‘कॅप्टन कुल’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या धोनीच्या मते आयपीएल आणि जगात अन्य देशांमध्ये आयोजित होणाऱ्या या प्रकारच्या टी-२० लीग स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान मैदानावर चांगला माहोल तयार करण्यास मदत मिळाली आहे.
एका व्यावसायिक कार्यक्रमानिमित्त विंडीजचा फलंदाज ख्रिस गेलसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेला धोनी म्हणाला,‘आम्ही सभ्य लोकांचा खेळ खेळतो. प्रत्येक खेळाडू विजयासाठी इच्छुक असतो. पण हे सर्व काही योग्य पद्धतीने घडायला पाहिजे. आयपीएलमुळे स्लेजिंगला क्रिकेटपासून दूर केले. मैत्रीमध्ये हास्यविनोद सुखावह असतात आणि टी-२० लीगमुळे हे सर्व काही शक्य झाले. अयपीएलमुळे स्लेजिंग संपविण्यास बरीच मदत झाली आहे. आयपीएल स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळी संस्कृती असलेले क्रिकेटपटू एकच ड्रेसिंग रूम शेअर करीत असल्यामुळे खेळाडूंमध्ये ऋणानुबंध निर्माण झाले. मला कदाचित ज्यांच्यासोबत चर्चा करण्याची संधीही मिळाली नसती, अशा अनेक व्यक्तींच्या जवळ येण्याची संधी केवळ आयपीएल स्पर्धेमुळे मिळाली.’
भारतीय कर्णधारासोबत सलोख्याचे संबंध असलेल्या गेलने या वेळी व्यासपीठावर यष्टिरक्षक फलंदाज असलेल्या धोनीच्या ‘हेलिकॉप्टर शॉट’ची नक्कल केली. आयपीएलमुळे खेळाडूंदरम्यानचा तणाव कमी झाला असल्याचे गेलने या वेळी स्पष्ट केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सलामीवीर फलंदाज असलेला गेल म्हणाला, ‘आयपीएलबाबत धोनीच्या मतासोबत सहमत आहो. आयपीएलमुळे क्रिकेट खेळाडूंदरम्यान संबंध सुधारण्यास मदत मिळाली. मैत्रीमुळे हास्यविनोद होत असतात. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या किरोन पोलार्डसोबत मी नेहमी याचा आनंद घेतो.’ आयपीएलमुळे मैत्री झाल्याचे उदाहरण देताना गेल म्हणाला, ‘आयपीएल स्पर्धेमुळे मला आरसीबीचे प्रतिनिधित्व करणारा आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कला जाणून घेण्याची संधी मिळाली. ड्रेसिंग रूममध्ये स्टार्क वेगळाच खेळाडू आहे. तो शांत व फार कमी बोलणारा खेळाडू आहे.’
गेलने क्रिकेटव्यतिरिक्त जमैकाचा स्टार धावपटू उसेन बोल्टसोबत असलेल्या मैत्रीबाबत भाष्य केले. गेलने या वेळी गमतीने म्हटले की, ‘एक दिवस १०० मीटर दौड स्पर्धेत या महान धावपटूला नक्कीच हरविणार.’ (वृत्तसंस्था)

आयपीएल स्पर्धेदरम्यान माझ्या संघाची रणनीती अन्य संघातील खेळाडूंना कळू नये म्हणून भारतीय खेळाडूंसोबतही चर्चा करीत नाही. स्पर्धेदरम्यान या सर्व बाबींचे भान ठेवावे लागते; पण आयपीएल स्पर्धेमुळे अनेक खेळाडूंसोबत माझे संबंध सुधारण्यास मदत मिळाली.
- महेंद्रसिंह धोनी

Web Title: 'Sledding' due to IPL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.