सिंधूची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

By Admin | Updated: November 30, 2015 00:58 IST2015-11-30T00:58:47+5:302015-11-30T00:58:47+5:30

जागतिक क्रमवारीतील १२ वी मानांकित खेळाडू भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने १ लाख २0 हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मकाऊ ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी महिला एकेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला

Sindhu wins hat-trick | सिंधूची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

सिंधूची विजेतेपदाची हॅट्ट्रिक

मकाऊ : जागतिक क्रमवारीतील १२ वी मानांकित खेळाडू भारताच्या पी. व्ही. सिंधू हिने १ लाख २0 हजार डॉलर बक्षीस रकमेच्या मकाऊ ओपन ग्रांप्री बॅडमिंटन स्पर्धेत रविवारी महिला एकेरीत चॅम्पियन बनण्याचा बहुमान मिळवला. महिला एकेरीच्या अंतिम फेरीत सहाव्या मानांकित जपानच्या मिनात्सू मितानी हिचा २१-९, २१-२३, २१-१४ असा एक तासाच्या रंगतदार लढतीत पराभव करताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
त्याचबरोबर सिंधूने सलग तिसऱ्यांदा मकाऊ ओपनचे विजेतेपद पटकावताना विजेतेपदाची हॅट्ट्रिकही पूर्ण केली. सिंधूने २0१४ मध्ये कोरियाच्या किम यो मिन आणि २0१३ मध्ये कॅनडाच्या ली मिशेल हिचा फायनलमध्ये पराभव करताना विजेतेपद पटकावले होते.
जागतिक क्रमवारीतील १८ वी मानांकित मिनात्सू आणि १२ व्या मानांकित सिंधू यांच्यात ही दुसरी लढत होती आणि या विजयाबरोबरच तिने जपानी खेळाडूविरुद्ध जपान ओपनमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला.
या सामन्यात सिंधूला मिनात्सूने कडवी झुंज दिली; परंतु भारतीय खेळाडूने प्रतिस्पर्धी खेळाडूच्या एकाच्या तुलनेत सात गेम पॉइंट मिळवले आणि सलग पाच गुणही जिंकले. तिने एकूण ६३ गुण जिंकताना चषकावर कब्जा केला.
पहिल्या गेममध्ये आत्मविश्वास उंचावलेल्या सिंधूसमोर मिनात्सू तग धरू शकली नाही आणि एकवेळ हैदराबादच्या या खेळाडूने प्रतिस्पर्धी जपानच्या खेळाडूला १६-५ ने मागे टाकले व हा गेम सिंधूने २१-९ असा सहज जिंकताना १-0 अशी आघाडी मिळवली; परंतु दुसऱ्या गेममध्ये जागतिक क्रमवारीतील १८ व्या मानांकित खेळाडूने जोरदार मुसंडी मारली आणि सिंधूला कडवी झुंज दिली. तिने सलग गुण मिळवले आणि सापसिडीप्रमाणे या गेममध्ये ९-९ आणि १६-१६ अशी बरोबरी साधली व हा गेम २३-२१ असा जिंकताना सामन्यात १-१ अशी बरोबरी साधताना चुरस वाढवली. तथापि, तिसऱ्या व निर्णायक गेममध्ये जपानी खेळाडू आत्मविश्वास हरवून बसली. सिंधूने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखताना ९-३ अशी आघाडी घेतली व हा गेम २१-१४ असा जिंकत विजेतेपद पटकावले.
हा शानदान विजय आहे. विजयामुळे मी खरच खूप आनंदीत आहे. स्पर्धेतील माझी कामगिरी एकूणच चांगली झाली.
अंतिम सामन्याती लपहिला स्पेल सोपा ठरला. परंतु, दुसऱ्या गेममध्ये तिने चांगला
खेळ केला.
गेममध्येच मला खेळ संपवायला हवा होता. परंतु, मी महत्त्वाच्या वेळेला दोन चुका केल्या. ही खूप निराशाजनक गोष्ट होती.
तिसऱ्या गेममध्ये मात्र मी आघाडी मिळवली आणि ती टिकवली. विजयामुळे खूपच आनंदीत आहे.
मितानी ही चांगली खेळाडू असून जपान ओपनमध्ये मला तिने हरविले होते. या पराभवाची मी आज परतफेड केली.

Web Title: Sindhu wins hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.