सिंधू उपांत्य फेरीत
By Admin | Updated: November 27, 2015 23:50 IST2015-11-27T23:50:57+5:302015-11-27T23:50:57+5:30
फुलराणी सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताच्या विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधू हिने आपेक्षित कामगिरी करताना मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटाची उपांत्य फेरी गाठली.

सिंधू उपांत्य फेरीत
मकाऊ : फुलराणी सायना नेहवालच्या अनुपस्थितीत भारताच्या विजेतेपदाचे आशास्थान असलेल्या पी. व्ही. सिंधू हिने आपेक्षित कामगिरी करताना मकाऊ ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला गटाची उपांत्य फेरी गाठली. त्याचवेळी पुरुष गटात मात्र भारताचे आव्हान संपुष्टात आले . बी. साई प्रणीत आणि एच. एस. प्रणय दोघांनाही अटीतटीच्या झालेल्या सामन्यात हार पत्करावी लागल्याने स्पर्धेतील गाशा गुंडाळावा लागला.
जागतिक क्रमवारीत १२व्या स्थानी असलेल्या सिंधूला उपांत्य फेरीत कूच करण्यासाठी कडव्या लढतीस सामोरे जावे लागले. चीनच्या जागतिक क्रमवारीत ९१व्या स्थानी असलेल्या चेन युफेईने सिंधूला तीन सेटपर्यंत झुंजवले. पहिला सेट जिंकून सिंधूने आश्वासक सुरुवात केली. मात्र यानंतर युफेईने चुरशीच्या झालेल्या खेळामध्ये अंतिम क्षणी खेळ उंचावताना दुसऱ्या सेटमध्ये बाजी मारली आणि सामना १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर मात्र सिंधूने आक्रमक खेळ करताना युफेईला पुनरागमनाची एकही संधी न देता २१-१६, २१-२३, २१-१३ अशा विजयासह दिमाखात उपांत्य फेरी गाठली.
दुसऱ्या बाजूला पुरुष गटात भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे. १५व्या मानांकीत प्रणीतला मलेशियाच्या बिगरमानांकीत गोह सून हुआतने धक्का देताना सर्वांचे लक्ष वेधले. १ तास १० मिनिटांपर्यंत रंगलेल्या या चुरशीच्या सामन्यात हुआतने प्रणीतला २१-१६, २१-२३, २१-१३ असा धक्का देत आगेकूच केली. त्याचप्रमाणे सातव्या मानांकीत प्रणयलाही धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या मानांकीत एहसान मुस्तफा विरुद्ध प्रणयला १८-२१, २१-१९, २१-११ असा पराभव पत्करावा लागला. (वृत्तसंस्था)