सिंधूचे कांस्यपदक पक्के; सायनाचे आव्हान संपुष्टात
By Admin | Updated: August 30, 2014 04:20 IST2014-08-30T04:04:21+5:302014-08-30T04:20:56+5:30
भारताची नवीन युवा बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिने आज येथे विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचताना सलग दुसऱ्यांदा आपले कांस्यपदक पक्के केले

सिंधूचे कांस्यपदक पक्के; सायनाचे आव्हान संपुष्टात
कोपनहेगेन : भारताची नवीन युवा बॅडमिंटन तारका पी.व्ही. सिंधू हिने आज येथे विश्व चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत पोहोचताना सलग दुसऱ्यांदा आपले कांस्यपदक पक्के केले आहे; परंतु स्टार शटलर सायना नेहवाल हिचे महिला एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे.
चीनमध्ये २0१३ मध्ये विश्व चॅम्पियनशिपमध्ये कास्यपदक जिंकणाऱ्या १९ वर्षीय सिंधूने पुन्हा एकदा जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करताना चीनच्या आॅल इंग्लंड चॅम्पियन शिझियान वांग हिचे आव्हान १९-२१, २१-१९, २१-१५ असे मोडीत काढले. त्याआधी आॅलिम्पिक कास्यपदक आणि सातव्या मानांकित सायनाला जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू चीनच्या शुएरुई हिच्याकडून अवघ्या ४५ मिनिटांत १५-२१, १५-२१ असे पराभूत व्हावे लागले. एक तास २५ मिनिटे रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीत सिंधू आणि वांग यांनी एकमेकांच्या चुकांचा फायदा घेताना गुण मिळवले. सुरुवातीला सिंधूने नेटवर वर्चस्व राखले आणि तिने ११-५ अशी आघाडी घेतली. तथापि, वाँगनेही लवकरच स्कोअर १५-१५ असा बरोबरीत केला आणि पुन्हा पहिला गेम जिंकताना १-0 अशी आघाडी घेतली.
पहिलाच गेम गमावल्यानंतर सिंधूने दुसऱ्या गेममध्ये ५-१ अशी आघाडी घेतली; परंतु वांगने लवकरच ६-६ अशी बरोबरी साधली. एक वेळ चिनी खेळाडू ११-९ अशी आघाडीवर होती. त्यानंतर सिंधूने १६-१६ अशी बरोबरी साधत व वांगने नेटवर केलेल्या चुकांमुळे १९-१६ अशी आघाडी घेतली. अखेर सिंधूने महत्त्वपूर्ण गुण मिळवताना सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. चीनच्या खेळाडूचे फटके बाहेर मारले. त्यामुळे भारतीय खेळाडूला ५-२ अशी आघाडी घेता आली. तथापि, वांगने मुसंडी मारत ५-५ अशी बरोबरी साधली. या दोन्ही खेळाडूंनी अनेकदा चुका केला; परंतु ब्रेकपर्यंत भारतीय खेळाडूने एका गुणाची आघाडी घेताना १२-१२ अशी बरोबरी सधली. वाँगने ड्रॉप आणि क्रॉसकोर्टच्या फटक्याचा चांगला उपयोग केला, तर सिंधूने चिनी खेळाडूच्या बॅकहँडच्या कमजोरीचा फायदा उचलताना १७-१५ अशी आघाडी घेतली. त्यानंतर सिंधूने सलग चार गुण घेताना वांगचे आव्हान संपुष्टात आणले आणि आपले सलग दुसरे कास्यपदक निश्चित केले.
तथापि, या प्रतिष्ठित स्पर्धेत सायनाला पदक मिळवण्याची प्रतीक्षा आणखी वाढली. आॅलिम्पिक चॅम्पियन आणि अव्वल मानांकित शुएरुईसमोर तिने सहजपणे शरणागती पत्करली. चिनी खेळाडूविरुद्ध सायनाचा हा आठवा पराभव ठरला. सायना उपांत्यपूर्व फेरीत प्रारंभपासूनच लयीत नव्हती. शुएरुईने सायनाने केलेल्या चुकांचा पुरेपूर फायदा घेताना पहिल्या गेममध्ये ९-४ अशी आघाडी घेतली; परंतु सायनाने मुसंडी मारताना हे अंतर १0-८ असे केले; चिनी खेळाडूने पुन्हा आपले वर्चस्व राखताना १८-११ अशी आघाडी मिळवताना पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये सायना आणि शुएरुई एक वेळ ५-५ अशा बरोबरीत होत्या. त्यानंतर सायनाने सलग चार गुण घेताना ९-५ अशी आघाडी घेतली. नंतर तिने १२-९ अशी चार गुणांची आघाडी घेतली; परंतु त्यानंतर चिनी खेळाडूने सलग ४ गुणांसह १२-१२ अशी बरोबरी साधली आणि त्यानंतर सायना थकली आणि शुएरुईला सामना जिंकण्यात फारसे कष्ट पडले नाहीत.
त्यााअधी श्रीकांतला पुरुष एकेरीत तिसऱ्या फेरीत आणि दुहेरीत मनू अत्री आणि सुमित रेड्डी या जोडीलाही पराभवाची चव चाखावी लागली. द्वितीय मानांकित चीनच्या लांग चेन याने २३ व्या मानांकित श्रीकांतचे आव्हान अवघ्या ३६ मिनिटांत २१-१२, २१-१0 असे मोडीत काढले. दोन्ही खेळाडू प्रथमच आमने-सामने उभे ठाकले होते. (वृत्तसंस्था)