सिंधू अंतिम फेरीत धडक
By Admin | Updated: November 29, 2015 01:30 IST2015-11-29T01:30:24+5:302015-11-29T01:30:24+5:30
भारताची स्टार बॅडमिंटनपटूू, पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात

सिंधू अंतिम फेरीत धडक
मकाऊ : भारताची स्टार बॅडमिंटनपटूू, पाचवी मानांकित पी. व्ही. सिंधू हिने एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या मकाऊ ओपन ग्रॅण्डप्रिक्स बँडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक दिली.
जागतिक क्रमवारीत १२ व्या स्थानावर असलेल्या सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात नववी मानांकित जपानची अकाने यामागुची हिचा एक तास चाललेल्या कडव्या संघर्षात २१-८, १५-२१, २१-१६ ने पराभव केला. या विजयासोबतच सिंधूने २०१३ च्या योनेक्स जपान ओपनमध्ये यामागुचीकडून झालेल्या पराभवाचा हिशेबही चुकता केला आहे. अंतिम फेरीत सिंधूला जपानची मिनात्सू मितानी आणि चीनची बिगजियाओ यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेतीविरुद्ध खेळावे लागणार आहे. शानदार फॉर्ममध्ये असलेल्या सिंधूने सामन्यावर सुरुवातीपासून पकड निर्माण केली. पहिला गेम केवळ १४ मिनिटांत २१-८ ने जिंकला. तथापि, दुसऱ्या गेममध्ये यामागुचीने मुसंडी मारली व २१-१५ असा विजय नोंदवीत सामना बरोबरीत आणला. निर्णायक गेममध्ये सिंधूने ११-५ अशी आघाडी संपादन केल्यानंतर यामागुचीने कडवा प्रतिकार केला. तथापि, सिंधूने तिचे आव्हान मोडीत काढून २१-१६ अशी सरशी साधत अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. (वृत्तसंस्था)