शुक्ला-शहरयार सदिच्छा भेट
By Admin | Updated: October 21, 2015 01:51 IST2015-10-21T01:51:34+5:302015-10-21T01:51:34+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य कसोटी मालिका व्हावी यासाठी भारत दौऱ्यावर चर्चेसाठी आलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी

शुक्ला-शहरयार सदिच्छा भेट
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संभाव्य कसोटी मालिका व्हावी यासाठी भारत दौऱ्यावर चर्चेसाठी आलेले पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांनी आज मंगळवारी आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.
पीसीबी अध्यक्ष हे मुंबईत शशांक मनोहर यांच्यासोबत चर्चा करणार होते, परंतु शिवसेना कार्यकर्त्यांनी बीसीसीआय मुख्यालयात राडा घातल्याने ही मुलाखत रद्द करण्यात आली होती. खान यांच्याशी झालेल्या भेटीनंतर शुक्ला यांनी सांगितले की, ही केवळ सदिच्छा भेट होती. कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही. याबाबत कोणतीही चर्चा ही बीसीसीआय अध्यक्षच करतील. यावर अंतिम निर्णयसुद्धा तेच घेतील. शुक्ला म्हणाले, ही मालिका होणार की नाही, कोठे होणार, कशी होणार या सर्व गोष्टी चर्चेतूनच निश्चित होतील.
ते म्हणाले, आपण चर्चेची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे, चर्चा कधी होणार हे बीसीसीआय अध्यक्षांवर अवलंबून आहे. शुक्ला यांनी या वेळी शिवसेनेवर टीका केली, ते म्हणाले, बीसीसीआय कार्यालयात घुसणे, आणि चर्चेत अडथळा आणणे हे सारासार चुकीचे आहे.
अरुण जेटलींसोबत भेटण्यास प्रयत्नशील ..
भारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान द्विपक्षीय मालिका आयोजित होण्याची शक्यता धूसर होत आहे, पण पीसीबी अध्यक्ष शहरयार खान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
शहरयार खान म्हणाले, ‘नजम सेठी दुबईला गेले आहेत. अरुण जेटली यांची भेट घेण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यांच्यासोबत या उद््भवलेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्याची इच्छा आहे.’
मालिका आयोजित होण्याच्या शक्यतेबाबत बोलताना शहरयार म्हणाले, ‘जोपर्यंत माझी जबाबदार पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा होत नाही तोपर्यंत याबाबत भाष्य करणे चुकीचे आहे. चर्चा झाल्यानंतरच याबाबत काही सांगता येईल.’
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलीस विभागाने आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खान यांना अतिरिक्त सुरक्षा पुरविण्याची सूचना केली आहे.