श्री माँ संघाची दमदार आगेकूच
By Admin | Updated: May 6, 2015 02:37 IST2015-05-05T20:20:03+5:302015-05-06T02:37:22+5:30
मुंबई: श्री माँ विद्यालय आणि यजमान सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना सिंघानिया चषक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच कायम राखली.

श्री माँ संघाची दमदार आगेकूच
मुंबई: श्री माँ विद्यालय आणि यजमान सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल या संघांनी आपआपल्या सामन्यात सहज बाजी मारताना सिंघानिया चषक आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच कायम राखली.
अत्यंत एक्तर्फी झालेल्या सामन्यात श्री माँ संघाने एकहाती वर्चस्व राखताना नालंदा स्कूलचा तब्बल २२२ धावांनी चुराडा केला. नाणेफेक जिंकून श्री माँ संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेऊन निर्धारीत ३० षटकांत ७ बाद २६८ धावांचा एव्हरेस्ट उभारला. निर्मय देवरुखकरने आक्रमक १२१ धावांची शतकी खेळी करुन नालंदाची गोलंदाजी फोडून काढली. आयुष पुजारीने निर्णायक क्षणी आक्रमक २४ धावा फटकावल्या. नालंदाकडून अमोघ एम याने एकट्याने नियंत्रित मारा करतअआ ४९ धावांत ३ बळी घेत श्री माँ संघाला रोखण्याचा अपयशी प्रयत्न केला.
यानंतर फलंदाजीला उतरलेल्या नालंदा संघाला श्री माँ संघाचे भलेमोठे आव्हान सुरुवातीपासूनच पेलवले नाही. आयुष मोगलने शानदार हॅट्ट्रीक नोंदवताना २५ धावांत ५ बळी घेत नालंदाच्या आव्हानातली हवाच काढली. धर्मेश मणियारने (२/११) देखील अचूक मारा करीत आयुषला चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर श्री माँ संघाने नालंदाला केवळ ४६ धावांत गुंडाळून दणदणीत विजय नोंदवला.
अन्य एका सामन्यात सहज विजय मिळवताना बलाढ्य सुलोचनादेवी सिंघानिया संघाने सरस्वती स्कूलचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. मिहिर किनारेने फटकावलेल्या ९६ धावांच्या जोरावर सरस्वती संघाने सिंघानियासमोर ३० षटकांत ५ बाद २०९ अशी भक्कम मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करतान विराज गोसावी (८२), क्षितीज बिसवास (६४) आणि प्रीथ्वीक पंडित (नाबाद २२) यांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर सिंघानिया संघाने ३ फलंदाजांच्या मोबदल्यात २७.१ षटकांत विजयी लक्ष गाठले. विराजने ६० चेंडूत ८२ धावांचा तडाखा देत सामनावीराचा मान मिळवला. (क्रीडा प्रतिनिधी)