पराभवाची सव्याज परतफेड करू : वॉटसन
By Admin | Updated: December 8, 2014 01:03 IST2014-12-08T01:03:02+5:302014-12-08T01:03:02+5:30
आॅस्ट्रेलियन संघ अजूनही फिलिप ह्युज याच्या निधनाच्या दु:खातून सावरला नसला, तरी अष्टपैलू शेन वॉटसन याने आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत आक्रमक खेळ करून

पराभवाची सव्याज परतफेड करू : वॉटसन
अॅडिलेड : आॅस्ट्रेलियन संघ अजूनही फिलिप ह्युज याच्या निधनाच्या दु:खातून सावरला नसला, तरी अष्टपैलू शेन वॉटसन याने आॅस्ट्रेलिया संघ कसोटी मालिकेत आक्रमक खेळ करून भारताला नमविण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. या ३३ वर्षीय खेळाडूने सांगितले की, गत आठवडा संघासाठी आव्हानात्मक होता. मात्र, संघ पूर्वीसारखा आक्रमक खेळ करणार आहे आणि गतवर्षी भारताकडून मिळालेल्या ०-४ असा पराभवाची सव्याज परतफेड करण्यात कोणतीही कसर ठेवणार नाही.
येथील पत्रकार परिषदेत तो म्हणाला, आक्रमक खेळ केल्यानंतर सर्वोत्तम कामगिरी करण्यात संघाला यश मिळते. मी आॅस्ट्रेलियन संघात खेळण्यास सुरुवात केली, तेव्हापासूनच मी पाहत आलोय. फलंदाजी आणि गोलंदाजीत आम्ही आक्रमकता दाखविणार. विशेषकरून गत अॅशेज मालिकेत आमच्या गोलंदाजांनी आक्रमकता दाखविली होती, तीच या मालिकेतही दिसेल. यात कोणताही बदल नसेल.
भारताने २०१३ मध्ये घरच्या मैदानावर आॅस्ट्रेलियाचा ४-० असा फडशा पाडला होता. याआधी २०११-१२ मध्ये आॅस्ट्रेलियाने त्यांच्या घरी भारताची अशीच दयनीय अवस्था केली होती. आॅस्ट्रेलियन संघाने शुक्रवारपासून सरावास सुरुवात केली. संघातील बहुतेक खेळाडू अजूनही ह्युजच्या निधनाच्या दु:खातून बाहेर पडलेले नाहीत. वॉटसन म्हणाला, शारीरिकदृष्ट्या तयार असलो, तरी मानसिकदृष्ट्या हळूहळू क्रिकेटकडे वळत आहे. गेले दोन दिवस हे मानसिकदृष्ट्या माझ्या कारकिर्दीतील सर्वांत आव्हानात्मक होते. त्याक्षणी मी एससीजी येथे उपस्थित होतो, परंतु मंगळवारपर्यंत कमबॅक करेन.
या मालिकेत आॅस्ट्रेलियाचे सर्व अव्वल खेळाडू खेळतील का, या प्रश्नावर वॉटसन म्हणाला, हो मला विश्वास आहे. सर्व या दु:खातून बाहेर पडले आहेत. काही खेळाडू इतरांच्या तुलनेत अजूनही सदम्यात आहेत. (वृत्तसंस्था)