शोएब मलिकने घेतला निवृत्तीचा निर्णय
By Admin | Updated: November 4, 2015 01:46 IST2015-11-04T01:36:22+5:302015-11-04T01:46:05+5:30
तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करणारा पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज आणि भारतीय टेनिस सुंदरी सानिया

शोएब मलिकने घेतला निवृत्तीचा निर्णय
नवी दिल्ली : तब्बल पाच वर्षांच्या कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करणारा पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज आणि भारतीय टेनिस सुंदरी सानिया मिर्झाचा पती शोएब मलिक याने मंगळवारी सर्वांनाच धक्का देताना आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ट्वीटरद्वारे आपल्या निवृत्तीची माहिती देताना मलिकने इंग्लंड विरुध्द सुरु असलेल्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना आपला अखेरचा सामना असेल असे स्पष्ट केले.
शारजाह येथे सुरु असलेल्या इंग्लंड विरुध्दच्या तिसऱ्या कसोटी मालिकेच्या तिसऱ्या दिवशी मलिकने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सध्या आमच्या संघात एकाहून एक असे सरस युवा खेळाडू असून ही वेळ कसोटी सामन्यांतून निवृत्ती घेण्यासाठी योग्य आहे, असे मलिकने यावेळी सांगितले. ३३ वर्षीय मलिकने या मालिकेद्वारे तब्बल ५ वर्षांच्या काळानंतर यशस्वी पुनरागमन केले होते. यावेळी त्याने आपल्या परिवाराला प्राधान्य देताना स्पष्ट केले की, इंग्लंड विरुध्द सुरु असलेला अंतिम कसोटी सामना आपल्या कारकिर्दीतील अखेरचा सामना असेल.