शिव थापा, कुलदीप उपांत्यपूर्व फेरीत
By Admin | Updated: September 27, 2014 02:37 IST2014-09-27T02:37:42+5:302014-09-27T02:37:42+5:30
चॅम्पियन बॉक्सर शिव थापा (५६ किलो) याने आशियाडमध्ये बॉक्सिंगची आज, शुक्रवारी सहज उपांत्यपूर्व फेरी गाठली

शिव थापा, कुलदीप उपांत्यपूर्व फेरीत
चॅम्पियन बॉक्सर शिव थापा (५६ किलो) याने आशियाडमध्ये बॉक्सिंगची आज, शुक्रवारी सहज उपांत्यपूर्व फेरी गाठली; पण रिंकमध्ये परतलेला अनुभवी अखिल कुमार (६० किलो) हा मात्र पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडला.
राष्ट्रीय चॅम्पियन कुलदीपसिंग याने ८१ किलोगटात उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली, तर अमृतप्रीतसिंग हा ९१ किलो गटात आगेकूच करण्यात अपयशी ठरला.
पहिल्या फेरीत वॉकओव्हर मिळालेला शिव भारताकडून रिंकवर येणारा पहिला बॉक्सर होता. त्याने पाकचा नादीर याला केवळ एक मिनिट २५ सेकंदांत लोळविले. आसामच्या शिवने नादीरच्या मस्तिष्कावर जोरदार ठोसा लगावताच त्याच्या उजव्या डोळ्याच्या वर जखम झाली. त्याच्या जखमेतून भळभळा रक्त वाहू लागताच रेफ्रीने तांत्रिक आधारे शिवला विजयी घोषित केले. नंतर रिंकमध्ये आलेल्या कुलदीपने थायलंडचा थोंगरातोक अनावत याला गुणांच्या आधारे २-१ ने नमवले. कुलदीपने दोन्ही फेऱ्यांत २-० ने आघाडी मिळवली. सायंकालीन सत्र भारतीय खेळाडूंसाठी निराशादायी ठरले. जखमी झाल्यामुळे तीन वर्षे बाहेर राहिल्यानंतर रिंकमध्ये परतलेल्या अखिलला फिलिपिन्सच्या चालीर सुआरेज याने पराभूत केले. या लढतीत अखिलची सुरुवात झकास झाली; पण ३३ वर्षांच्या अखिलने प्रतिस्पर्धी खेळाडूला पहिल्या तीन मिनिटात बुचकळ्यात पाडले. नंतर मात्र त्याच्यावर थकवा प्रभावी झाला. अखेरच्या दहा सेकंदांत अखिलचे गमशिल्ड बाहेर पडल्याने सुआरेजला एक गुण मिळताच त्याने बाजी मारली.