शिखर धवनची ‘दीड शतकी’ खेळी

By Admin | Updated: June 11, 2015 01:08 IST2015-06-11T01:08:07+5:302015-06-11T01:08:07+5:30

शिखर धवनची दीड शतकी (१५० धावा) खेळी, तसेच मुरली विजयसह सलामीला केलेल्या नाबाद २३९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने बांगलादेशविरुद्ध एकमेव

Shikhar Dhawan's 'One Century' | शिखर धवनची ‘दीड शतकी’ खेळी

शिखर धवनची ‘दीड शतकी’ खेळी

फतुल्लाह : शिखर धवनची दीड शतकी (१५० धावा) खेळी, तसेच मुरली विजयसह सलामीला केलेल्या नाबाद २३९ धावांच्या भागीदारीमुळे भारताने बांगलादेशविरुद्ध एकमेव कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययातही पकड घट्ट केली.
सिडनी कसोटीत शतक ठोकणारा लोकेश राहुल आजारी पडल्यानंतर मिळालेल्या संधीचा पुरेपूर लाभ घेत धवनने १३४ चेंडू टोलवीत १९ चौकारांसह नाबाद १५० धावा ठोकल्या. विजयनेदेखील त्याला साथ देत १७९ चेंडूंत नाबाद ८५ धावा केल्या. ५६ षटकांच्या खेळात भारतीय फलंदाजांना कुठलाही अडसर आला नाही. कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतल्यानंतर धवन- विजय यांनी दुसऱ्यांदा २०० धावांची भागीदारी केली. याआधी दोघांनी २०१३ मध्ये मोहालीत २८९ धावा ठोकल्या होत्या. या दोघांनी आज सुरुवातीपासून प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चोपून काढण्याचे तंत्र अवलंबले. विकेट काहीशी मंद आणि पाटा होती. त्यावर यजमान फिरकी गोलंदाजांनादेखील फारसे यश मिळू शकले नाही. धवनला २४ व्या षटकांत पावसाने हजेरी लावण्याआधी जीवदान मिळाले. फिरकी
गोलंदाज तैजुलच्या चेंडूवर शुवागताने शॉर्ट मिडविकेटवर त्याचा झेल सोडला.त्या वेळी धवन ७३ धावांवर खेळत होता.
पावसामुळे जवळपास चार तासांचा खेळ वाया गेला. खेळ सुरू होताच दोन्ही फलंदाज पुन्हा फॉर्ममध्ये दिसले. विजयने वेगवान शाहीदच्या चेंडूूूवर षटकार खेचून अर्धशतक गाठले. धवननेही झुबेरला चौकार ठोकून स्वत:चे तिसरे शतक
पूर्ण केले. यजमान संघाने चार
तज्ज्ञ फिरकीपटू आणि एकमेव
वेगवान गोलंदाजांसह उतरण्याचा निर्णय घेतला, पण धवन- विजय यांचा झंझावात थोपविण्यात अपयश आल्याने बांगलादेशचा निर्णय चुकल्याचे स्पष्ट झाले. धवन फटकेबाजी करीत असताना विजयने त्याला एकेक धावा घेत संधी देण्याचे धोरण अवलंबले होते. मुख्य फिरकी गोलंदाज साकिब हा फारसा प्रभावी जाणवत नव्हता. याशिवाय सर्वांत वेगवान गोलंदाज रुबेल हुसेन याला बाहेर बसविणे संघ व्यवस्थापनाला महागात पडले.
अंतिम एकादशमध्ये असलेला एकमेव वेगवान गोलंदाज शाहीदने ५२ धावा मोजल्या, पण त्याला गडी बाद करता आला नाही. भारताच्या सलामी जोडीला त्रस्त करून सोडणारा वेग आणि विविधता त्याच्या चेंडूत मुळीच जाणवत नव्हती. (वृत्तसंस्था)

Web Title: Shikhar Dhawan's 'One Century'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.