नेमबाजीत शेख सहाव्या स्थानी
By Admin | Updated: March 3, 2017 04:51 IST2017-03-03T00:34:41+5:302017-03-03T04:51:57+5:30
भारतीय नेमबाज सिराज शेख आज येथे क्वालिफिकेशन फेरीत आपल्या पहिल्या आयएसएसएफ विश्वकपच्या फायनलमध्ये पोहोचला;

नेमबाजीत शेख सहाव्या स्थानी
नवी दिल्ली : भारतीय नेमबाज सिराज शेख आज येथे क्वालिफिकेशन फेरीत आपल्या पहिल्या आयएसएसएफ विश्वकपच्या फायनलमध्ये पोहोचला; परंतु तो सहाव्या स्थानावर राहत पुरुष स्कीट स्पर्धेतून बाद झाला.
शेखने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि क्वालिफाइंगमध्ये त्याने १२१ गुणांची नोंद केली. शूट आॅफमध्ये त्याची कामगिरी माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतील आठव्या स्थानावरील नेमबाज डेन्मार्कचा जेसपर हेन्सनपेक्षा सरस ठरली; परंतु अंतिम फेरीत तो या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. इटलीचा रिकार्डो फिलिपेली याने त्याच्याच देशाच्या आणि विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन गॅब्रिरेली रासेट याला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आॅस्ट्रेलियाच्या पॉल अॅडम्सने कांस्यपदक आपल्या नावावर केले. शेख म्हणाला की, ‘हा चांगला अनुभव होता. मला चांगले वाटले; परंतु काही वेळा नेम चुकला. सुधारणेत अद्यापही वाव आहे.’
शेखचा स्कीट नेमबाजीच्या सात वर्षांतील हा पहिला विश्वकप फायनल होता. त्याने अबुधाबी येथे नुकत्याच झालेल्या आशियाई शॉटगन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. तिथे तो पाचव्या क्रमांकावर होता. या २६ वर्षीय नेमबाजाने क्रिकेटरच्या रूपात सुरुवात केली होती आणि १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते.