एका सामान्य रिक्षाचालकाची मुलगी असलेल्या आणि कधीकाळी उधारीवर ग्लव्ह्ज घेऊन बॉक्सिंगच्या रिंगमध्ये उतरणाऱ्या मीनाक्षी हुड्डा हिने बॉक्सिंगच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावलं आहे. घरची गरिबी, हालाखीची परिस्थिती, लोकांचे टक्केटोमणे आणि काहीतरी करून दाखवण्याचा दबाव हे सारं काही सहन करत मीनाक्षी हिने जीवनात हे मोठं यश मिळवलं आहे.
इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे झालेल्या या स्पर्धेमध्ये भारताच्या बॉक्सिंग टीमने एकूण चार पदके जिंकली. यामध्ये दोन सुवर्ण, एक रौप्यपदक आणि एका काँस्यपदकाचा समावेश आहे. यामध्ये मीनाक्षी हुड्डा हिने (४८ किलो वजनी गट) आणि जेस्मिन लेंबोरिया (५७ किलो वजनी गट) यांनी मिळवलेलं यश हे खास वैशिष्ट्यपूर्ण ठरलं आहे. मीनाक्षी हिने अंतिम फेरीमध्ये २०२४ मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती कझाकिस्तानची नाजिम काइजोबे हिला ४१ ने पराभूत केले. तर जेस्मिन लेंबोरिया हिने पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेती पोलंडची जुलिया जेरेमेटा हिला ४-१ ने पराभूत केले.
मीनाक्षी हिने प्रचंड संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. मीनाक्षी हिचे वडील श्रीकृष्ण हे भाड्याची रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. घरात हालाखीची परिस्थिती असली तरी त्यांनी मुलीचं स्वप्न तुटू दिलं नाही. एवढंच नाहीतर मीनाक्षी हिला कुटुंबीयांच्या टोमण्यांचाही सामना करावा लागला. बॉक्सिंग खेळताना दुखापत झाली तर लग्न होणार नाही, असं लोकं म्हणायची. मात्र मीनाक्षी आणि तिच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही. वडीलही मीनाक्षीच्या मागे ठामपणे उभे राहिले. मात्र घरच्या परिस्थितीमुळे कधीकधी बॉक्सिंग खेळण्यासाठीचे ग्लव्हजही त्यांना उधारीवर घ्यावे लागत असत.
दरम्यान, बॉक्सिंगमध्ये विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर मीनाक्षीने सांगितले की, आधी लोक टोमणे मारायचे. काही जण आजही बोलतील, मात्र बदलल्या काळासोबत लोकांचीही बॉक्सिंगमधील उत्सुकता वाढली आहे. माल लोकांचं काम बोलण्याचंच असतं. आधीही बोलायचे आणि आजही बोलतील. गावात खुल्या विचारांचे लोक नसतात. मात्र आमच्या गावातील सिनियर्स असलेल्या शिक्षा नरवाल, ज्योती, मोनिका यांनी पदकं जिंकण्यास सुरुवात केल्यावर लोकांचा खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन थोडा बदलला. आता तर सर्वजण बॉक्सिंग खेळण्यास सांगतात. सध्या ६० ते ७० मुली आमच्या सेंटरमध्ये सराव करत आहेत.