शास्त्री वर्ल्डकपपर्यंत संचालकपदी !
By Admin | Updated: September 27, 2014 02:18 IST2014-09-27T02:18:50+5:302014-09-27T02:18:50+5:30
माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांना २०१५ च्या वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याचा निर्णय

शास्त्री वर्ल्डकपपर्यंत संचालकपदी !
चेन्नई : माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांना २०१५ च्या वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघाच्या संचालकपदी कायम राखण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणीत आज, शुक्रवारी घेण्यात आला. तसेच इंग्लंडमधील निराशाजनक कामगिरीनंतर टीकेचे धनी बनलेले प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनाही वर्ल्डकपपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा २० नोव्हेंबरला घेण्यात येणार असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले. कार्यकारिणीतील या निर्णयामुळे सहायक स्टाफ सदस्य संजय बांगर, भारत अरुण आणि आर. श्रीधर यांचे करार वर्ल्डकप संपेपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
दरम्यान, निलंबित अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्या पुनर्वसनासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या मुकुल मुदगल समितीकडून श्रीनिवासन यांना क्लीन चीट मिळेल, अशी आशा बीसीसीआयच्या अनेक सदस्यांना आहे. श्रीनिवासन यांनी तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून बैठकीला उपस्थिती लावली. यावेळी आयसीसीचे पहिले चेअरमन म्हणून श्रीनिवासन यांची निवड झाल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण सभा पुढे का ढकलण्यात आली, याचे स्पष्टीकरण विदर्भ क्रिकेट असोसिएशनला हवे असल्याने त्यांनी बैठकीत जोरदार विरोध दर्शविला.
या बैठकीत बीसीसीआयने माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेवर पेनी आणि गोलंदाज प्रशिक्षक जो डावेस यांच्यासमोर बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रुजू होण्याचा पर्याय ठेवला. तो पर्याय त्यांना मान्य नसल्यास त्यांनी पदभार सोडण्याचा अप्रत्यक्ष सल्लाच समितीने दिला. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तेथील क्रिकेटला बसलेल्या फटक्याची पाहणी करण्यासाठी पथक पाठविण्याचा निर्णयही घेण्यात आला. (वृत्तसंस्था)