शशांक मनोहर यांचे मिशन क्लीन BCCI
By Admin | Updated: November 9, 2015 16:55 IST2015-11-09T15:03:46+5:302015-11-09T16:55:27+5:30
आयपीएल फिक्सिंगप्रकरणामुळे डागाळलेल्या बीसीसीआयमध्ये आता शशांक मनोहर यांनी 'साफसफाई'ची मोहीमच सुरु केली आहे.

शशांक मनोहर यांचे मिशन क्लीन BCCI
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ९ - आयपीएल फिक्सिंगप्रकरणामुळे प्रतिमा डागाळलेल्या बीसीसीआयमध्ये आता शशांक मनोहर यांनी 'साफसफाई'ची मोहीमच सुरु केली आहे. अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर मनोहर यांनी हितसंबंध आड येऊ नये म्हणून आयपीएलच्या कार्यकारी समितीमधून रवी शास्त्रींची उचलबांगडी असून त्या जागी माजी कर्णधार सौरव गांगुलीचा समावेश करण्यात आला आहे.
२०१३ मध्ये आयपीएलमध्ये फिक्सिंग आणि बेटिंग प्रकरण उघड झाले व क्रिकेट जगतामध्ये बीसीसीआयच्या प्रतिमेला धक्का बसला. सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर एन श्रीनिवासन यांना बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले. यानंतर जगमोहन दालमिया यांची या पदावर निवड झाली. पण महिनाभरापूर्वी दालमियांचे निधन झाले व या पदावर शशांक मनोहर यांची एकमताने निवड करण्यात आली. बीसीसीआयचा कार्यभार स्वीकारताच शशांक मनोहर यांनी मंडळात साफसफाई मोहीम राबवण्याचे संकेत दिले होते. यानुसार सर्वप्रथम आयपीएलच्या सीओओ पदावरुन सुंदर रमण यांना राजीनामा देण्यास भाग पडण्यात आले. बेटिंगप्रकरणी रमण यांची भूमिका संशयास्पद होती.
सोमवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण बैठक पार पडली. या बैठकीत हितसंबंध आड येणा-या प्रश्नांवर कायम स्वरुपी तोडगा काढण्यात आला. यात रवी शास्त्री यांना आयपीएलच्या कार्यकारी समितीमधून तर रॉजर बिन्नी यांना निवड समितीतून हटवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. शास्त्री हे टीम इंडियाचे संचालक असल्याने त्यांना हटवण्यात आले आहे. तर सौरव गांगुलीसमोर समालोचन किंवा कार्यकारी समिती असे पर्याय ठेवण्यात आले. यापैकी सौरवने कार्यकारी समितीमध्ये येण्यास तयारी दर्शवली आहे. याशिवाय सौरव गांगुलीकडे बीसीसीआयच्या तांत्रिक समितीचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. या समितीचा कार्यभार यापूर्वी अनिल कुंबळेकडे होता.
बीसीसीआयचा कार्यभार पारदर्शक करु असा पुनरुच्चार शशांक मनोहर यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केला. भारत पाक क्रिकेट मालिकेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळणे गरजेचे असून याशिवाय आम्ही काहीच करु शकत नाही असे मनोहर यांनी सांगितले.