क्रिकेटमधल्या आर्थिक हितसंबंधांवर शशांक मनोहरांचा हातोडा
By Admin | Updated: November 4, 2015 15:31 IST2015-11-04T15:27:00+5:302015-11-04T15:31:46+5:30
खेळाडू, पदाधिकारी, संघमालक, पगारी नोकर, समालोचक अशा क्रिकेटशी संबंधित विविध लोकांची मर्यादा काय असावी याची रुपरेखा मनोहर यांनी आखली आहे.

क्रिकेटमधल्या आर्थिक हितसंबंधांवर शशांक मनोहरांचा हातोडा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - अब्जावधी रुपयांची माया लाभलेल्या व अनेक आरोपांचे ग्रहण लागलेल्या क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी अत्यंत कठोर उपायांची अमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
क्रिकेटचा गाडा हाकणा-या पदाधिका-यांचा आयपीएलच्या टीममध्ये, कंपनीमध्ये संबंध असता कामा नये, सगळ्या खेळाडुंनी त्यांचे संबंध असलेल्या व्यवस्थापनांची माहिती द्यावी, बीसीसीआयकडून पगार, मानधन स्वीकारणा-यांनी बोर्डाच्या समितीवर असू नये, निवृत्त क्रिकेटपटू, विद्यमान क्रिकेटपटू तसेच नातेवाईक यांचे कुठलेही आर्थिक संबंध खेळाच्या आड येता कामा नयेत, खेळाडूंचा स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपन्यांशी संबंध असून नये, निवडसमितीतल्या सदस्याचा खेळाडुंच्या आर्थिक संबंधांशी कुठलाही संबंध असू नये अशा अनेक प्रकारच्या नियमांचा समावेश मनोहरांच्या प्रस्तावामध्ये आहे.
शशांक मनोहरांचा हा कठोर कार्यवाहीचा प्रस्ताव संमत झाला तर सुनील गावस्कर, रवी शास्त्री व महेंद्रसिंह ढोणीसारख्या अनेक दिग्गजांना त्याचा फटका बसणार आहे.
आयपीएलमधल्या स्पॉट फिक्सिंग व बेटिंगच्या आरोपांनी क्रिकेटची प्रतिमा मलीन झाली होती आणि जस्टिस लोधा कमिटीने बीसीसीआयने यावर तोडगा काढावा असे सुनावले होते.
त्यासंदर्भात मनोहरांनी तीन पानी प्रस्ताव तयार केला असून सदर प्रस्ताव ९ नोव्हेंबरच्या बीसीसीआयच्या बैठकीत मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव संमत व्हावा आणि क्रिकेटमधल्या आर्थिक गैरव्यवहारांना आळा बसावा अशी अपेक्षा क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.