शारापोवाला दिलासा; बंदी झाली १५ महिन्यांची
By Admin | Updated: October 5, 2016 03:59 IST2016-10-05T03:59:54+5:302016-10-05T03:59:54+5:30
रशियाची टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या डोपिंगच्या आरोपामुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जात असतानाच तीची शिक्षा कमी करताना १५ महिन्यांची करण्यात आली आहे.

शारापोवाला दिलासा; बंदी झाली १५ महिन्यांची
लुसाने : रशियाची टेनिस सुंदरी मारिया शारापोवा सध्या डोपिंगच्या आरोपामुळे दोन वर्षांच्या बंदीला सामोरे जात असतानाच तीची शिक्षा कमी करताना १५ महिन्यांची करण्यात आली आहे. त्यामुळे मारिया आगामी एप्रिल महिन्यात पुनरागमन करू शकेल. शिवाय, फ्रेंच ओपनच्या माध्यमातून पुन्हा एकदा ग्रँडस्लॅमसाठी खेळेल.
क्रीडा लवादाने शारापोवावरील बंदीमध्ये नऊ महिन्यांची शिक्षा कमी केली आहे. जानेवारी महिन्यात आॅस्टे्रलिया ओपन दरम्यान मेलडोनियम घेतल्याप्रकरणी ती दोषी आढळली होती. पाच ग्रँडस्लॅम विजेती आणि जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल खेळाडू असलेल्या मारियाने जूनमध्ये आंतरराष्ट्रीय टेनिस संघटनेने आपल्यावर लावलेल्या दोन वर्षांच्या बंदीच्या शिक्षेविरुद्ध क्रीडा लवादामध्ये अपील केले होते.
यावर क्रीडा लवादाने निर्णय दिला की, ‘डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटीव्ह आढळल्याने मारियादेखील दोषी आहे. मात्र, १५ महिन्यांची शिक्षा योग्य ठरेल.’ ही बंदी २६ जूनपासून सुरू असून, २५ जानेवारी २०१८ पर्यंत सुरू राहणार होती. मात्र, क्रीडा लवादाच्या निर्णयानंतर आता शारापोवा पुढील वर्षी पुनरागमन करू शकेल.
यावर शारापोवा म्हणाली, ‘गतवर्षी मार्च महिन्यात लागलेल्या बंदीविषयी कळाल्यानंतर मी आपल्या करकिर्दीतील सर्वात कठीण प्रसंग अनुभवले. आता मी माझ्या सर्वात आनंदी दिवसांपैकी एक दिवस पाहत आहे. मी एप्रिलमध्ये पुनरागमन
करू शकते हे कळाल्यानंतर खूप आनंद होत आहे.’ (वृत्तसंस्था)