शमी व यादव यांच्या कामगिरीची साथ मिळाली
By Admin | Updated: March 10, 2015 01:39 IST2015-03-10T01:39:16+5:302015-03-10T01:39:16+5:30
विश्वकप स्पर्धेत नव्या चेंडूने मारा करणारे भारतीय गोलंदाज मोहंमद शमी आणि उमेश यादव यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यामुळे मला लाभ मिळाला

शमी व यादव यांच्या कामगिरीची साथ मिळाली
हॅमिल्टन : विश्वकप स्पर्धेत नव्या चेंडूने मारा करणारे भारतीय गोलंदाज मोहंमद शमी आणि उमेश यादव यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवल्यामुळे मला लाभ मिळाला, अशी प्रतिक्रिया भारताचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने व्यक्त केली. माझ्या यशाचे श्रेय शमी व यादव यांना जाते, असेही मोहीत म्हणाला. मोहीतने चार सामन्यांत ६ बळी घेतले.
त्याने प्रतिषटक ३.९० च्या सरासरीने धावा दिल्या. भारतीय गोलंदाजांमध्ये त्याने सर्वांत कमी सरासरीने धावा दिलेल्या आहेत.
आयर्लंडविरुद्ध मंगळवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलताना मोहित म्हणाला, ‘‘शमी व उमेश यांच्या कामगिरीमुळे मला
मदत मिळत आहे. ते चांगली गोलंदाजी करीत असून प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यात
यशस्वी ठरले आहेत. माझे
काम दडपण कायम राखण्याचे
आहे. त्यामुळे आश्विन व
जडेजाला लाभ घेता येईल, अशी योजना असते. फलंदाज सुरुवातीपासून दडपणाखाली असल्यामुळे मला लाभ मिळत आहे. माझे काम केवळ क्षमतेनुसार गोलंदाजी करण्याचे आहे.’’
मोहित म्हणाला, ‘‘चांगल्या कामगिरीला कुठली मर्यादा नसते. आम्हाला अद्याप स्लॉग ओव्हर्समध्ये गोलंदाजी करावी लागलेली नाही, हे विसरता येणार नाही. सेडन पार्क मैदान अॅडलेड ओव्हल, एमसीजी आणि वाका या मैदानांच्या तुलनेत लहान असल्यामुळे गोलंदाजी करताना चेंडूच्या टप्प्यामध्ये बदल करावा लागेल. मोठ्या व लहान मैदानात खेळताना फरक जाणवतो. मैदानाच्या आकाराचा विचार न करता गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करणे आवश्यक ठरते. उभय संघांसाठी सारखीच परिस्थिती आहे. आपल्या शक्तीस्थळांचा विचार करीत सर्वोत्तम कामगिरी करण्यास प्रयत्नशील आहोत.’’
इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे संधी मिळालेला मोहीत म्हणाला, ‘‘तिरंगी मालिकेत पर्थमध्ये खेळल्याचा लाभ मिळाला. तिरंगी मालिकेदरम्यान येथील वातावरणासोबत समरस होण्याची संधी मिळाली.’’ (वृत्तसंस्था)